गेल्या दहा महिन्यात मेक्सिकोत ‘ड्रग वॉर’मध्ये २९ हजारांहून अधिक जणांचा बळी

गेल्या दहा महिन्यात मेक्सिकोत ‘ड्रग वॉर’मध्ये २९ हजारांहून अधिक जणांचा बळी

मेक्सिको सिटी – मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या टोळ्यांकडून करण्यात येणार्‍या हिंसक कारवायांमध्ये तब्बल २९ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. २०१९ सालच्या पहिल्या १० महिन्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या असून हा हिंसाचार म्हणजे ‘अमली दहशतवाद’ असल्याचा गंभीर इशारा मेक्सिकन अधिकार्‍यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात ‘युद्ध’ पुकारण्याची वेळ आली आहे, असे बजावले होते.

मेक्सिकोच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने बुधवारी देशात घडलेल्या हिंसक घटनांची माहिती जाहीर केली. २०१९ सालच्या पहिल्या १० महिन्यात मेक्सिकोत तब्बल २९ हजार ४१४ जणांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सर्वाधिक हिंसक घटना घडल्या आहेत. मेक्सिकोच्या विविध भागांमध्ये दर दिवशी सरासरी १०० जणांचा बळी जात असल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले आहे. मेक्सिकोचे नवे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंसाचार अधिकच भडकल्याचे गेल्या वर्षभरातील माहितीवरून दिसून येते.

मेक्सिकन अधिकार्‍यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अमली पदार्थांचा व्यापार करणारी कार्टेल्स सामान्य जनतेचा ढाल म्हणून वापर करू लागली आहेत. ही गोष्ट म्हणजे अमली दहशतवादच आहे’, असा इशारा टॅमोलिपा प्रांताचे गव्हर्नर फ्रान्सिस्को गार्सिया यांनी दिला. काही वर्षांआधी देशाच्या ज्या भागांना अमली पदार्थांचा व्यापार व हिंसाचाराची झळ लागली नव्हती त्या भागातही आता मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊ लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर यांनी डिसेंबर महिन्यात सूत्रे हाती घेतल्यावर सुरक्षेच्या मुद्यावर स्थिती सुधारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर गेल्या वर्षभरात देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेची दैना उडाली आहे. मेक्सिकोतील ‘गुआनजुआतो’ व ‘मेक्सिको सिटी’ या भागातच हत्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ओब्राडोर यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

मेक्सिकोत अंमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचे जबरदस्त वर्चस्व आहे. मेक्सिकोत अशी १० प्रमुख ‘कार्टेल्स’ असून त्यातील पाचहून अधिक कार्टेल्सच्या प्रमुखांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र अशा प्रकारच्या कारवाईनंतरही मेक्सिकोतील हत्यांचे सत्र थंडावले नसल्याचे नव्या माहितीवरून दिसून येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info