तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका व चीनमध्ये शीतयुद्ध सुरू आहे – मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखांचा दावा

तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका व चीनमध्ये शीतयुद्ध सुरू आहे – मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – ‘अमेरिका, युरोप, चीन अशा जगाच्या सर्व भागातून आता प्रश्‍न विचारले जात आहेत. आता नवे शीतयुद्ध सुरू होणार आहे या मुद्याभोवती लक्ष केंद्रित झालं आहे. हे शीतयुद्ध तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल का याचे उत्तर कदाचित २०२० सालात मिळेल’, अशा शब्दात मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाचे संकेत दिले. हे संकेत देतानाच अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने अमेरिका व चीनदरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्वासाठी संघर्ष आधीच सुरू झाल्याची कबुली दिल्याची माहितीही मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांनी दिली.

अमेरिका व चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून व्यापारयुद्ध सुरू आहे. हे व्यापारयुद्ध तात्पुरत्या काळासाठी रोखणार्‍या करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र हा करार झाला असला तरी तो दीर्घकाळासाठी कायम राहण्याची शक्यता कमी असल्याचे मत दोन्ही देशांमधील अधिकारी व तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्याचवेळी काही अधिकारी व्यापारयुद्ध संपण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी इतर क्षेत्रात अमेरिका व चीन समोरासमोर ठाकण्याची भीती व्यक्त करीत आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाबाबत केलेला उल्लेख याचाच भाग आहे. स्मिथ यांनी शीतयुद्धाचा उल्लेख करतानाच दोन्ही देशांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी परिस्थिती अवघड करून ठेवल्याची नाराजी व्यक्त केली. ‘अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी असे नियम आणि कायदे केले आहेत की परस्परांच्या कंपन्यांना दुसर्‍या बाजारेपेठेत काम करणे अवघड ठरावे. आता व्यापारी कराराच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी झाली असली तरी या क्षेत्रातील कठीण परिस्थितीत लवकर बदलण्याची कोणतीही शक्यता नाही’, असे स्मिथ यांनी बजावले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अमेरिकेवर मात करण्याची भीती व्यक्त करून नवे नियम व निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकी कंपन्यांकडून प्रगत तसेच संवेदनशील तंत्रज्ञान सहजगत्या चिनी कंपन्यांना मिळू नये यासाठी संसदेकडूनही नवे कायदे करण्यात येत आहेत. चिनी कंपन्यांकडून अमेरिकेच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकही रोखण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी चीनने अमेरिकी कंपन्यांना माहिती व तंत्रज्ञान ‘शेअर’ करणे बंधनकारक केले असून त्याविरोधात कंपन्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘रोबोटिक्स’ चर्चेत असून या क्षेत्रातील आघाडीच्या बळावर अमेरिकेवर मात करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी चीनच्या सत्ताधार्‍यांनी आपल्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दिले असून अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांमध्ये विस्तारासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनच्या ‘हुवेई’ कंपनीचे प्रकरण याचे ताजे उदाहरण असून अमेरिकेने ‘५जी’ क्षेत्रातील या कंपनीचा विस्तार रोखण्यासाठी राजनैतिक दबावाचाही वापर सुरू केला आहे.

चीनकडूनही या मुद्यावर टोकाची भूमिका स्वीकारण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांनी केलेल्या दाव्याप्रमाणे तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाचा भडका अधिक विस्तारण्याचे संकेत मिळत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info