Breaking News

कोरोनाव्हायरसच्या फैलावावरून अमेरिका आणि चीनमध्ये वाद पेटला

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसची साथ जागतिक मंदी घेऊन येत असल्याचा इशारा दिला. तसेच ही साथ जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत?धुमाकूळ घालत राहिल, अशी चिंता ट्रम्प यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत या ‘चायनिज व्हायरस’मुळे फटका बसलेल्या उद्योगांना अमेरिकेचे सरकार संपूर्ण सहकार्य करील, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यांच्या या दाव्यावर चीनने आक्षेप नोंदविला आहे. तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

जगभरातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १,८६,६६५ वर गेली असून या साथीत दगावलेल्यांची संख्या ७,४६७ वर गेली आहे. या साथीत सर्वाधिक बळी चीनमध्ये गेले असून त्यांची संख्या ३,२२६ असल्याचे सांगितले जाते. तर इटलीमध्ये या साथीची २७९८० जणांना लागण झाली असून २१५८ जणांचा यात बळी गेला आहे. सोमवारी एकट्या इटलीमध्ये ३४९ जणांचा बळी गेला असून एकाच दिवसात या विषाणूने एका देशात केलेला सर्वात मोठा संहार ठरतो आहे. इटलीमध्ये अशारितीने बळी जात राहिले तर या देशातील कोरोनाव्हायरसचा मृत्यूदर चीनलाही मागे टाकेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरात ही साथ थैमान घालत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

पुढच्या १५ दिवसांसाठी अमेरिकेत दहाहून अधिकजणांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले. तसेच याबरोबरच ‘चायनिज व्हायरस’मुळे अमेरिकेच्या काही उद्योगांना जबरदस्त फटका बसत असल्याचे सांगून अशा परिस्थितीत आपले प्रशासन अमेरिकन उद्योगांना संरक्षण देईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. मात्र त्यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चायनिज व्हायसर’ असा केल्याने चीनने त्यावर जोरदार आक्षेप नोंदविला. दुसर्‍यांवर शेरेबाजी करण्याच्या आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आधी आपल्या देशाची चिंता करावी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.

याआधीही ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसला चायनिज व्हायरस म्हटले होते. त्यावेळीही चीनने नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पाठोपाठ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही चीनला फटकारल्याचे दिसत आहे. पॉम्पिओ यांनी चीनचे स्टेट काऊन्सिलर यॉंग जेईची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कोरोनाव्हायरस अमेरिकन लष्करानेच चीनमध्ये पसरविल्याचा दावा चीनमधील काहीजणांनी केला होता. त्यावर चीनने काही काळासाठी सूचक मौन पाळले होते. यावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यॉंग जेईची यांना खडसावल्याचे सांगितले जाते. हा काही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्याची वेळ नाही, असा टोला यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला.

दरम्यान, कॅनडाने देखील कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी अमेरिकन नागरिकांचा अपवाद वगळता, सर्वच देशांच्या प्रवाशांना बंदी घातली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info