Breaking News

चीनला रोखण्यासाठी अमेरिकेच्या  आशिया-पॅसिफिकमधील तैनातीत वाढ

वॉशिंग्टन/बीजिंग – आशिया-पॅसिफिक क्षेत्रात टॉमाहॉक क्षेपणास्त्राचा ताफा तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हा निर्णय घेत असताना, आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बॉम्बर्स विमानाचे पथक रवाना केले आहे. त्याच्या काही दिवस आधी अमेरिकन युद्धनौका ‘साऊथ चायना सी’ व तैवानच्या आखातात गस्त घालत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील चीनची वाढती आक्रमकता डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेने या तैनातीचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून ही तैनाती केली जात असताना चीनने देखील सदर क्षेत्रातील आपली विमानवाहू युद्धनौका व पाणबुड्यांचा वावर वाढविला आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीला चीन जबाबदार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनला याचा गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. मात्र अमेरिकेच्या विचारांचा आपल्यावर परिणाम झालेला नाही, हे दाखविण्यासाठी चीन आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या नौदलाचे सामर्थ्य प्रदर्शन करीत आहे. व्हिएतनाम, तैवान या देशांच्या विरोधात चिनी नौदलाने आक्रमक भूमिका घेऊन चिनी नौदलाने व्हिएतनामचे जहाज देखील बुडविले होते. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने चीनला उत्तर देण्याची जोरदार तयारी केली आहे.

यासाठी अमेरिकेने पहिल्यांदाच लांब पल्ल्याची टॉमाहॉक क्रुज् क्षेपणास्त्रे या क्षेत्रात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. १९९१ सालच्या ‘गल्फ वॉर’मध्ये टॉमाहॉक क्षेपणास्त्रांना प्रसिद्धी मिळाली होती. तर गेल्या काही वर्षांपासून सिरियात ‘आयएस’च्या ठिकाणांवर हल्ल्यासाठी अमेरिकेने यांचा वापर केला. अशी ही खतरनाक क्रुज् क्षेपणास्त्रे चीनजवळच्या ‘फर्स्ट आयलँड चैन’ अर्थात जपानची बेटे, तैवान, फिलिपाईन्स येथे तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या क्षेपणास्त्रांबरोबर अमेरिकी नौदलाला सहाय्य करण्यासाठी मरिन्सचे पथक देखील तैनात असणार आहे.

या सागरी क्षेत्राची सुरक्षा आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ही तैनाती असणार असल्याची माहिती जनरल डेव्हिड बर्जर यांनी अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्विसेस कमिटीला दिली. तर टॉमाहॉक क्रुज् क्षेपणास्त्रांबरोबर अमेरिकी मरिन्सची तैनाती चीनला इशारा देणारी असल्याचे अमेरिकन विश्लेषकांचे म्हणणे आहे. टॉमाहॉक क्षेपणास्त्रांच्या या तैनातीआधी अमेरिकेने गुआम बेटांवर प्रगत बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा अमेरिकेने ‘युएसएस थियोडोर रुझ्वेल्ट’ ही विमानवाहू युद्धनौका गुआम बेटावर तैनात केली आहे. तर गेल्या महिन्यात अमेरिकेच्या युद्धनौकांनी दोन वेळा ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून गस्त घातली होती.

चीनने आपल्या नौदलाचे शक्तीप्रदर्शन सुरु केले असून काही आठवड्यांपूर्वी चीनने व्हिएतनामचे जहाज बुडविले होते. तसेच तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनची लढाऊ विमाने घुसखोरी करुन इथला तणाव वाढवित असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलण्याची सुरुवात केली असून लवकरच याचे परिणाम आशिया-पॅसिफिक क्षेत्रात दिसू लागतील.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info