चीनकडून होणाऱ्या संशोधनाच्या चोरीविरोधात अमेरिकेची ‘ऍक्शन’ सुरू

चीनकडून होणाऱ्या संशोधनाच्या चोरीविरोधात अमेरिकेची ‘ऍक्शन’ सुरू

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर चीनविरोधात सुरु केलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने या देशावरील कारवाईचा फास अधिकच आवळण्यासाठी पावले उचलली आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीनकडून होणारे सायबरहल्ले व संशोधनाची चोरी याबाबत स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करून अशा कारवाया तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला. तर अमेरिकी तपासयंत्रणांनी आपल्या नव्या अहवालात, कोरोना प्रकरणी चीनवर उघड ठपका ठेवून पुढील कारवाई अधिक आक्रमक असेल, असे संकेत दिले आहेत. चीनने यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून अमेरिका चीनची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या व्यापारी तसेच बुद्धिसंपदेच्या लुटीबाबत सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. चीन अमेरिकेची लूट करणारा दरोडेखोर असल्याचा ठपकाही ट्रम्प यांनी ठेवला होता. चीनकडून होणाऱ्या या कारवायांना आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी आक्रमक निर्णयही घेतले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनविरोधात छेडलेल्या संघर्षानंतर या निर्णयांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून ही बाब अधोरेखित होत आहे. पॉम्पिओ यांनी, चीनच्या सत्ताधारी राजवटीशी संबंधित सायबर गट व हॅकर्स अमेरिकेची बुद्धीसंपदा तसेच कोरोना साथीशी निगडित संशोधन चोरत आहे, असा थेट आरोप केला. चीनने या घाणेरड्या कारवाया ताबडतोब थांबवाव्यात, असा इशाराही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. हा इशारा देताना त्यांनी अमेरिकी यंत्रणांनी सुरू केलेली कारवाई व अहवालाचाही उल्लेख केला.

अमेरिकेचा न्याय विभाग, प्रमुख तपास यंत्रणा ‘एफबीआय’ आणि ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाने गेल्या काही महिन्यात चीनकडून सुरू असणाऱ्या कारवायांविरोधात आक्रमक मोहीम छेडली आहे. चीनने अमेरिकेतील संशोधन चोरण्याचा प्रयत्न करणारा अमेरिकी प्रोफेसर व दोन संशयितांना ताब्यात घेऊन खटला दाखल केला आहे. येत्या काही महिन्यात चीनच्या अशा कारवायांप्रकरणी अजून काही खटले दाखल होणार असल्याची माहितीही न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फेब्रुवारी महिन्यात ‘एफबीआय’च्या संचालकांनी चीनने अमेरिकेचे तंत्रज्ञान  चोरल्याचा संशय असणाऱ्या हजारांहून अधिक घटनांचा तपास सुरू असल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी एफबीआयने ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, चिनी हॅकर्स कोरोनासंबंधित संशोधन चोरण्यासाठी सायबरहल्ले करीत असल्याचा इशारा दिला होता.

अमेरिकेने सुरू झालेल्या या कारवायांवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकी यंत्रणांची कारवाई म्हणजे चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका परराष्ट्र विभागाकडून करण्यात आली.  कोरोना साथीवरील अपयश झाकण्यासाठी अमेरिका चीनला बळीचा बकरा बनवित असल्याचा टोलाही चीनच्या प्रवक्त्याने लगावला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info