व्हेनेझुएलाचे ३१ टन सोने ‘बँक ऑफ इंग्लंड’ने परत करावे – हुकूमशहा मदुरो यांची मागणी

व्हेनेझुएलाचे ३१ टन सोने ‘बँक ऑफ इंग्लंड’ने परत करावे – हुकूमशहा मदुरो यांची मागणी

कॅराकस/लंडन – कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे निधी नसल्याने ब्रिटनमध्ये ठेवण्यात आलेले सोने परत देण्यात यावे, अशी मागणी व्हेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मदुरो यांनी केली आहे. यासाठी व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बँकेकडून ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ‘बँक ऑफ इंग्लंड’मध्ये ठेवण्यात आलेले सुमारे एक अब्ज डॉलर्स मूल्याचे ३१ टन सोने यापूर्वी झालेल्या करारानुसार परत द्यावे, असा दावा करण्यात आला आहे. जवळपास नऊ वर्षांपूर्वी व्हेनेझुएलाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांनी, देशाच्या मालकीचा २११ टनांचा सोन्याचा साठा परदेशातून परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यानंतर जवळपास १०० टनांहून अधिक सोने मायदेशी परत आणण्यात चावेझ यांना यशही मिळाले होते. मात्र अजूनही काही टन सोने परदेशात असून त्यात ‘बँक ऑफ इंग्लंड’मधील ३१ टन सोन्याचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हेनेझुएलाच्या ३१ टन सोन्याची किंमत सध्या एक अब्ज डॉलर्सहुन अधिक आहे. व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बँकेने दाखल केलेल्या याचिकेत, कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. सोन्याच्या विक्रीतून मिळणारा निधी संयुक्त राष्ट्रसंघटनेकडे ट्रान्सफर करून त्याचा वापर औषधे व इतर वैद्यकीय उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरण्यात येईल, असे याचिकेत सांगण्यात आले आहे.

‘बँक ऑफ इंग्लंड’ने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्रिटन सरकारने व्हेनेझुएलाचे हुकूमशहा मदुरो यांची राजवट मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाचे सोने परत देण्यास ब्रिटन सरकार परवानगी देणार नाही, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

व्हेनेझुएलाचे दिवंगत हुकूमशहा चावेझ यांनी देशात १०० टनांहून अधिक सोने परत आणले होते. मात्र सध्या व्हेनेझुएलाकडे फारसे सोने शिल्लक राहिलेले नाही. निकोलस मदुरो यांनी गेल्या काही वर्षात आपली राजवट टिकविण्यासाठी रशिया, चीन, इराण व तुर्कीची मदत घेतली आहे. या देशांनी मदतीच्या बदल्यात व्हेनेझुएलाकडील सोन्याचे साठे ताब्यात घेतल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर ‘बँक ऑफ इंग्लंड‘ कडून सोने माघारी आणण्याचा प्रयत्न म्हणजे राजवटीला समर्थन देणाऱ्या देशांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेली खेळी असू शकते. यापूर्वी मदुरो यांनी इतर देशांकडून सहाय्य मिळवूनही देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे व्हेनेझुएलात अराजक निर्माण झाले असून लाखो नागरिकांनी देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

व्हेनेझुएलात सध्या महागाई प्रचंड भडकली असून, एका अमेतिकी डॉलरसाठी तब्बल अडीच लाख बॉलिव्हर (व्हेनेझुएलाचे चलन) मोजावे लागत आहेत. एक लिटर इंधनासाठी तब्बल पाच ते साडेसात लाख बॉलिव्हर मोजणे भाग पडत आहे, दर आठवड्यात जीवनावश्यक गोष्टींच्या किमतीत ८० ते १५० टक्क्यांनी वाढ होत असुन महागाईचा दर चार हजार टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेवर तीव्र उपासमारीची वेळ ओढवली असून रोजच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info