पर्शियन आखातातील इराणच्या गस्तीनौकांना अमेरिकेचा इशारा

पर्शियन आखातातील इराणच्या गस्तीनौकांना अमेरिकेचा इशारा

मनामा – ‘पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या जहाजांनी अमेरिकेच्या युद्धनौकांपासून शंभर मीटर अंतरावरुन प्रवास करावा. अन्यथा सदर जहाजापासून आपल्या युद्धनौकेला धोका असल्याचे समजून स्वसंरक्षणार्थ आवश्यक ती कारवाई केली जाईल’, असा इशारा अमेरिकेच्या नौदलाने दिला आहे. कोणत्याही देशाचा नामोल्लेख टाळून अमेरिकेच्या नौदलाने दिलेला हा इशारा इराणला ऊद्देशून असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्यात इराणच्या गस्तिनौकांनी अमेरिकेच्या युद्धनौकेचा धोकादायकरित्या पाठलाग केला होता. त्या पार्श्वभुमीवर, अमेरिकेने हा इशारा दिल्याचे दिसत आहे. तर अमेरिकन नौदलाच्या या इशाऱ्याची पर्वा न करता पर्शियन आखातातील आपल्या नौदलाची गस्त सुरू राहील, असे प्रत्युत्तर इराणने दिले आहे.

पर्शियन आखातात तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या आरमाराच्या प्रवक्त्या कमांडर रिबेका रेबारीच यांनी हा इशारा दिला. ‘पर्शियन आखातातील अमेरिकेची तैनाती सुरक्षेसाठी असून ही कुठल्याही एका देशाच्या विरोधात नाही. अशा परिस्थितीत अमेरिकन युद्धनौकेच्या १०० मीटर जवळून कुठल्याही देशाच्या जहाजाने प्रवास केला, तर तो आपल्या सुरक्षेसाठी घातक मानून त्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार अमेरिकेला असेल’, असे अमेरिकेच्या कमांडर रेबारीच यांनी बजावले आहे. याआधीही अमेरिकन नौदलाने अशीच भूमिका स्वीकारलेली होती. आता केवळ नव्याने याची माहिती दिली जात आहे, असेही पुढे रेबारीच यांनी स्पष्ट केले.

पर्शियन आखातात गस्त घालणाऱ्या इराणसाठी अमेरिकेचा हा इशारा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या महिन्यात इराणच्या सुमारे ११ गस्तीनौकांनी पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेजवळून धोकादायक प्रवास केला होता. या इराणच्या गस्ती नौकांनी अमेरिकी युद्धनौकेच्या दहा मीटर अंतरापर्यंत धडक मारल्याचा आरोप अमेरिकेच्या नौदलाने केला होता. इराणच्या गस्तिनौकांनी अमेरिकेच्या युद्धनौकेला टक्कर दिली असती तर पर्शियन आखातात संघर्षाचा मोठा भडका उडाला असता, असा इशाराही अमेरिकेच्या नौदलाने त्यावेळी दिला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला यापुढे इराणच्या गस्तिनौकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेचा नौदलाने यावेळी दिलेला हा इशारा देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या त्या आदेशाचा पुढचा भाग असल्याचे दिसत आहे.

अमेरिकन नौदलाच्या इशाऱ्याला इराणने बुधवारी प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने इशारा दिला म्हणून इराणच्या जहाजांची पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील गस्त बंद होणार नाही. यापुढेही ही गस्त अशीच सुरू राहणार असल्याची घोषणा इराणच्या नौदलाने केली. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या नौदलाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला धमकावले होते. अमेरिकेमुळे पर्शियन आखातातील सुरक्षा धोक्यात आली, तर अमेरिकेच्या युद्धनौकांना जलसमाधी देऊ, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने दिली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info