Breaking News

अमेरिकेने इराणवरील निर्बंधांचा फास अधिकच आवळला

वॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास अधिकच घट्ट आवळला आहे. याबरोबर २०१५ सालच्या अणुकरारांतर्गत इराणला मिळालेली शेवटची सवलतही अमेरिकेने काढून घेतली. अमेरिकेशी चर्चा करा, अन्यथा आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याची तयारी ठेवा, असा इशारा अमेरिकेने इराणला दिला आहे. मात्र, सवलती काढून घेतल्याने इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नाही, अशी घोषणा करुन इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

२०१५ साली झालेल्या अणुकराराअंतर्गत  अमेरिका आणि मित्रदेशांनी इराणला काही सवलती बहाल केल्या होत्या. या सवलतीअंतर्गत रशिया, चीन आणि युरोपिय देशांकडून इराणच्या नागरी अणुकार्यक्रमाला सहाय्य मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेतल्यानंतरही यातील काही सवलती कायम ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, यापुढे इराणला कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. यामुळे रशिया, चीन आणि युरोपीय देशांकडून इराणच्या अराक या नागरी अणुप्रकल्पाला मिळणारे सहाय्य देखील यापुढे अमेरिकेच्या निर्बंधांच्या कचाट्यात येणार आहे.

अराक अणुप्रकल्प हा नागरी वापरासाठी असल्याचा दावा इराण करीत आहे. या अणुप्रकल्पाचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जात असल्याचे इराणने म्हटले आहे. पण इराण आपल्या लष्करी उद्दीष्टांसाठी अराक अणुप्रकल्पाचा वापर करीत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. म्हणूनच या नव्या निर्बंधांद्वारे अमेरिकेने इराणवरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती अमेरिकेने इराणसाठी नियुक्त केलेले विशेषदूत ब्रायन हूक यांनी दिली. त्याचबरोबर इराणला सवलत हवी असल्यास, अमेरिकेशी चर्चा करावी, अन्यथा या निर्बंधांमुळे आपली अर्थव्यवस्था भुईसपाट करुन घेण्यासाठी इराणने तयार राहावे, असा इशारा हूक यांनी दिला. पुढील दोन महिन्यात अमेरिकेच्या या नव्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

पण इराणने अमेरिकेचे प्रस्ताव धुडकावून लावला आहे. इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. अराक येथील अणूप्रकल्पही अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चालू राहील, असे  इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोज कमलवांदी यांनी म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प प्रशासनाने आपली इराणविरोधी भूमिका अधिकच तीव्र केल्याचे दिसत आहे. पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या  अमेरिकन युद्धनौकेचा इराणच्या युद्धनौकांनी धोकादायकरित्या पाठलाग केल्यानंतर अमेरिकेच्या भूमिकेत हा आक्रमक बदल झाला आहे. यापुढे पर्शियन आखातात अमेरिकेच्या युद्धनौकांना धोका निर्माण झाल्यास तत्काळ हल्ले चढविण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. त्यानंतर आता इराणवर नवे निर्बंध लादून अमेरिकेने इराणच्या आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला नवा धक्का दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info