पर्शियन आखातात अमेरिकन युद्धनौकांचा पाठलाग करीत राहू – इराणच्या नौदलप्रमुखांची धमकी

पर्शियन आखातात अमेरिकन युद्धनौकांचा पाठलाग करीत राहू – इराणच्या नौदलप्रमुखांची धमकी

तेहरान – ‘अमेरिकेची जहाजे जिथे कुठे असतील, तिथे-तिथे इराणच्या गस्तीनौका त्यांचा पाठलाग करतच राहतील’, अशी धमकी इराणच्या नौदलाच्या प्रमुखांनी दिली. इराणच्या गस्तिनौकांनी पर्शियन आखातात अमेरिकन युद्धनौकांचा धोकादायकरित्या पाठलाग केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या युद्धनौकेजवळ १०० मीटर अंतरावर आलेल्या कूठल्याही जहाजाला उडवून देण्याचे आदेश आपल्या नौदलाला दिले होते. त्यानंतर हा इराणला अमेरिकेने दिलेला सज्जड इशारा असल्याचे बोलले जात होते. त्यावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे हे प्रत्युत्तर आल्याचे दिसत आहे.

पर्शियन आखातात अमेरिकन युद्धनौका

इराणच्या नौदलात गुरुवारी ११२ नव्या स्पीडबोट्स दाखल झाल्या आहेत. या स्पीडबोट्समुळे पर्शियन आखातातील इराणच्या आक्रमकतेत वाढ होईल, असा दावा रिव्होल्युशनरी गार्डचे वरिष्ठ जनरल हुसेन सलामी यांनी केला. त्याचबरोबर ‘पर्शियन आखात शत्रूसाठी नरकासमान करू. यामुळे शत्रूला या सागरी क्षेत्रातून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही’, असेही सलामी पुढे म्हणाले. तर, येत्या काळात पर्शियन आखातातील इराणच्या नौदलाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढेल. जिथे कुठे अमेरिकेची जहाज दिसतील, त्या प्रत्येक ठिकाणी इराणच्या गस्तिनौका त्यांचा पाठलाग करतील, असा इशारा इराणच्या नौदलाचे प्रमुख अॅडमिरल अलिरेझा तांगसिरि यांनी दिला.

याआधीच इराणच्या नौदलाच्या ताफ्यात ३४२ स्पीडबोट्स आहेत. नौदलात सर्वाधिक स्पीडबोट्स असणाऱ्या देशांच्या यादीत इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराणच्या नौदलातील या स्पीडबोट्सना स्वार्मबोट्स म्हणून देखील ओळखले जाते. इराणच्या या स्पीडबोट्स आपल्या युद्धनौकांसाठी धोकादायक बनल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. गेल्या महिन्यात इराणच्या सुमारे ११ गस्तीनौकांनी पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेजवळून धोकादायकरित्या प्रवास केला होता. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या नौदलाने इराणला इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला यापुढे इराणच्या गस्तिनौकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर, अमेरिकेच्या नौदलाने सौदी अरेबिया बरोबर पर्शियन आखातात विशेष सरावही सुरू केला आहे. पर्शियन आखाताला दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी हा सराव आवश्यक असल्याचे अमेरिकी नौदलाने म्हटले आहे. हा सराव सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासात इराणने ११२ स्पीडबोट्स आपल्या नौदलात सहभागी करून अमेरिका आणि मित्रदेशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info