आर्मेनिया-अझरबैजान युद्धाच्या नव्या भडक्याने तिसरी संघर्षबंदीही अपयशी

आर्मेनिया-अझरबैजान युद्धाच्या नव्या भडक्याने तिसरी संघर्षबंदीही अपयशी

येरेवान/बाकु – गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेले आर्मेनिया-अझरबैजान युद्ध रोखण्यासाठीचे प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या पुढाकाराने दोन्ही देशांनी संघर्षबंदीची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हल्ले सुरु झाले असून दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर रशियाने आर्मेनियानजिक तुर्कीचे काही ड्रोन्स पाडल्याचे वृत्त काही माध्यमांमधून समोर आले आहे.

 

२७ सप्टेंबरपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजान या देशांमध्ये युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आवाहनानंतरही दोन्ही देशांच्या नेत्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी झालेल्या संघर्षबंदीच्या दोन प्रयत्नांनंतर युद्ध अधिकच पेटल्याचे समोर आले आहे. अझरबैजानच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुर्कीने घेतलेली आक्रमक भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने संघर्षबंदीसाठी घेतलेला पुढाकार लक्ष वेधून घेणारा ठरला होता. अमेरिकेच्या प्रस्तावानुसार, रविवारपासून संघर्षबंदी लागू होणार होती.

पण ही संघर्षबंदीही अपयशी ठरल्याचे नव्या हल्ल्यांवरून समोर आले आहे. आर्मेनियाने अझरबैजानमधील तीन भागांमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा आरोप अझेरी सूत्रांनी केला. तर आर्मेनियातील नव्या शहरांवर हल्ले चालू झाल्याची माहिती आर्मेनियन प्रवक्त्यांनी दिली. दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात तोफा, रॉकेट्स, क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर सुरू असून त्यात हजारो जणांचा बळी गेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका वक्तव्यात, आर्मेनिया-अझरबैजान युद्धात सुमारे पाच हजार जणांचा बळी गेल्याचा उल्लेख केल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली होती. मात्र त्याला दोन्ही देशांच्या यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, आर्मेनियातील रशियन तळावरून करण्यात आलेल्या कारवाईत तुर्कीची काही ड्रोन्स पाडण्यात आल्याचे दावे समोर आले आहेत. रशियातील काही माध्यमांनी लष्करी सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले असून तुर्की व अझरबैजानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाने यासाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणेचा वापर केल्याचेही सांगण्यात येते.

English   हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info