अमेरिकेचा इराणवरील हल्ला सर्वंकष युद्धाला आमंत्रण देईल – इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार

अमेरिकेचा इराणवरील हल्ला सर्वंकष युद्धाला आमंत्रण देईल – इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार

तेहरान – ‘इराणला युद्ध नको आहे. इराण युद्धाची सुरुवातही करणार नाही. पण अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचे डावपेच आखातातील व्यापक युद्धाला आमंत्रण देणारे असतील’, असा इशारा इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे लष्करी सल्लागार हुसेन देहघान यांनी दिला. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवरील हल्ल्याची संधी शोधत असल्याचा दावा देहघान यांनी केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌सच्या प्रमुखांनी देखील कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा इराण लवकरच सूड घेईल, अशी धमकी दिली.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे सल्लागार तसेच इराणचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखण्यात येणारे हुसेन देहघान यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापासून सावध राहण्याची आवश्‍यकता असल्याचे म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये असलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणविरोधात काही तरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याचा दावा देहघान यांनी केला. त्यामुळे, ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर असेपर्यंत इराक, सिरिया तसेच लेबेनॉनमधील इराणसंलग्न गटांनी कुठलीही चिथावणीखोर कारवाई करू नये, अशी सूचना देहघान यांनी या गटांना केल्याचे सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

इराणला युद्ध अपेक्षित नाही. पण त्याचबरोबर अमेरिकेला अपेक्षित असलेल्या वाटाघाटींसाठी देखील इराण तयार नसल्याचे देहघान यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत, अमेरिका इराणच्या विरोधात छोटा संघर्ष छेडू शकेल. मात्र असे झाले तर या संघर्षाचे रुपांतर सर्वंकष युद्धात होईल आणि या संकटसमोर अमेरिका, आखातच काय तर जग देखील उभे राहू शकणार नाही, असे देहघान यांनी धमकावले. त्याचबरोबर इराणच्या क्षेपणास्त्रांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही, असेही देहघान म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून इराणने अमेरिकेला धमकावण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील निवडणुकांबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या निकालाने सुखावलेले इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि सौदीच्या अरब मित्रदेशांना धमकावले होते. ट्रम्प हे फक्त 70 दिवसांसाठी राष्ट्राध्यक्ष असून इराणची राजवट कायमस्वरूपी असेल, अशी धमकी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर इराणने अमेरिकेला निर्णायक प्रत्युत्तराचा इशाराही दिला होता. पण इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या सल्लागारांनी दिलेल्या इशाऱ्यामध्ये चिंतेचे सूर लागल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info