इस्रायली पंतप्रधानांच्या अघोषित सौदी दौऱ्याने जगभरात खळबळ – अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत क्राऊन प्रिन्स सलमान यांची भेट घेतली

इस्रायली पंतप्रधानांच्या अघोषित सौदी दौऱ्याने जगभरात खळबळ – अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत क्राऊन प्रिन्स सलमान यांची भेट घेतली

जेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाचा अघोषित दौरा करून प्रिन्स मोहम्मद बिन सलमान व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली. याबाबतची माहिती उघड झाल्यानंतर, आखातासह जगभरात खळबळ माजली आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन देखील यावेळी हजर होते. अमेरिकेत सत्ताबदल होत असताना इराणची वाढलेली आक्रमकता हा इस्रायल इतकाच सौदी अरेबियासाठीही चिंतेचा विषय ठरतो आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान व सौदीच्या क्राऊन प्रिन्सची झालेली ही भेट फार मोठ्या उलथापालथींचे संकेत देत आहे.

सोमवारी दुपारी इस्रायलचे शिक्षणमंत्री योव्ह गॅलंट यांनी इस्रायलच्या लष्करी रेडिओवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या सौदी भेटीची पुष्टी केली. पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात झालेली भेट ही ऐतिहासिक घटना असल्याचे गॅलंट म्हणाले. अमेरिका, इस्रायल व सौदीच्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत गॅलंट यांनी बोलण्याचे टाळले.

संयुक्त अरब अमिरात (युएई) व बाहरिन या देशांनी इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णयघेतला आहे. सौदी अरेबियाने अद्याप अशा निर्णयाची घोषणा केलेली नसली, तरी सौदीच्या पाठिंब्यावरच युएई व बाहरिनने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. इस्रायल व युएईमधील विमानसेवेसाठी आपली हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय घेऊन सौदीने तसे स्पष्ट संकेतही दिले होते. यामुळे सौदीच्या नेतृत्त्वाखाली असलेला अरब-आखाती देशांचा गट पुढच्या काळात इस्रायलला मान्यता देऊन, पुढच्या काळात इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अधिकृत पातळीवर सौदी अरेबिया व मित्रदेशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले नव्हते, त्या काळातही छुप्यारतीने हे देश एकमेकांशी चर्चा करीतच होते, असा दावा काही विश्‍लेषक करीत आहे. इराणच्या वाढत्या आक्रमकतेमुळेच, पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सुटलेला नसताना सौदी तसेच मित्रदेशांना इस्रायलशी जुळवून घ्यावे लागत असल्याचे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर येण्याच्या आधी ज्यो बायडेन यांनी इराणबरोबरील अणुकराराचे पुनरुज्जीवन करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे इस्रायलसह सौदी अरेबिया व इतर आखाती देश अस्वस्थ झाले असून सामरिक पातळीवर सहकार्य वाढवून सौदी व इस्रायल इराणच्या या धोक्याला उत्तर देत असल्याचे दिसत आहे.

इस्रायली पंतप्रधानांच्या सौदी दौऱ्याची माहिती उघड होण्याच्या काही तास आधी सौदीचे परराष्ट्रमंत्री ‘फैसल बिन फरहान अल सौद’ यांनी देखील इस्रायलबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी काही अटींवर सौदी तयार असल्याचे म्हटले होते. इस्रायलने पॅलेस्टाईनला स्वायत्त राष्ट्राचा दर्जा दिल्यास इस्रायल-सौदी सहकार्यास काहीच आक्षेप नसल्याचे फैसल यांनी म्हटले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info