रशियाच्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 जवानांचा बळी

- प्रशिक्षणासाठी आलेल्या परदेशी नागरिकांकडून बेछूट गोळीबार

मॉस्को/किव्ह – रशियाच्या बेलगोरोद प्रांतातील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 11 जवानांचा बळी गेला आहे. लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या दोन परदेशी नागरिकांनी तळावरील शस्त्रे ताब्यात घेऊन बेछूट गोळीबार केल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली. दोन्ही हल्लेखोर ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे रशियन सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यात युक्रेनी लष्कर तसेच गुप्तचर यंत्रणांकडून रशियन तळ, वीजकेंद्रे, नागरी वस्त्या, इंधन साठे, पूल यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

लष्करी तळावर

रशियाच्या ‘वेस्टर्न मिलिटरी ड्रिस्ट्रिक्ट’चा भाग असणाऱ्या बेलगोरोद प्रांतातील लष्करी तळावर नव्या तैनातीसाठी भरती होणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शनिवारी प्रशिक्षण सुरू असताना दोन जणांनी तळावरील शस्त्रास्त्रे उचलून लष्करी जवान तसेच अधिकाऱ्यांवर बेछूट गोळीबार सुरू केला. यात 11 जवान तसेच अधिकाऱ्यांचा जागीच बळी गेला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. हल्लेखोरांना स्नायपर्सनी ठार केल्याची माहिती रशियन सूत्रांनी दिली. हल्लेखोर एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असलेल्या देशातील असल्याचे वृत्त ‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे.

लष्करी तळावर

पाश्चिमात्य माध्यमांनी बळी गेलेल्या रशियन जवानांची संख्या 20हून अधिक असल्याचा दावा केला. त्याचवेळी हल्लेखोर तीन होते व त्यातील एक पळण्यात यशस्वी झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे. हल्लेखोर ताजिकिस्तानचे असल्याचेही पाश्चिमात्य माध्यमांनी सांगितले. मात्र रशियाने या बाबींना दुजोरा दिलेला नाही. बेलगोरोद हा प्रांत युक्रेन सीमेला लागून आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनकडून सातत्याने या प्रांताला लक्ष्य करण्यात येत आहे. लष्करी तळासह वीजयंत्रणा तसेच इंधनाच्या साठ्यांवर युक्रेनने रॉकेट्स व क्षेपणास्त्रे डागली होती. हल्ल्यांसाठी ड्रोन्सचाही वापर करण्यात आल्याचे उघड झाले होते.

लष्करी तळावर

दरम्यान, रशियाने युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. लढाऊ विमानांच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात आले असून राजधानी किव्हनजिकच्या भागासह खार्किव्ह, खेर्सन, झॅपोरिझिआ तसेच डोनेत्स्कमध्ये मारा करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये लष्करी तळ व शस्त्रसाठ्यासह पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून रशियाने युक्रेनमधील पायाभूत सुविधांवरील क्षेपणास्त्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील वीजयंत्रणा तसेच पाणीपुरवठा कोलमडला आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर दीर्घकालिन ‘ब्लॅकआऊट’ची वेळ ओढवली आहे. युक्रेन सरकारने आपल्या नागरिकांना मेणबत्त्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे.

शनिवारी बेलारुसमध्ये रशियन जवानांची नवी तुकडी दाखल झाली आहे. ही तुकडी बेलारुस व युक्रेनच्या सीमाभागात तैनात करण्यात येणार आहे. लष्करी तुकडी तैनात करतानाच बेलारुसच्या लढाऊ विमानांना अण्वस्त्रहल्ल्यांसाठी सज्ज करण्याचे संकेतही रशियाकडून देण्यात आले आहेत. बेलारुसकडे असलेल्या ‘एसयु-25’ लढाऊ विमानांमध्ये त्यासाठी बदल करण्यात येतील, असे रशियाकडून सांगण्यात आले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info