Breaking News

अणुकरारासाठी इराणकडून अमेरिकेला दोन आठवड्यांची मुदत

तेहरान – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून आक्रमक बनलेल्या इराणने अणुकराराबाबत अमेरिकेला नवा इशारा दिला. २०१५ सालच्या अणुकरारात सहभागी होण्यासाठी अमेरिकेकडे फक्त दोन आठवड्यांचा कालावधी असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी बजावले. इराणकडून सातत्याने दिल्या जाणार्‍या या धमक्यांनंतरही बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्यावर ठाम आहे.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्थानिक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेला धमकावले. इराणच्या संसदेत झालेला ठराव आणि इराणमधील आगामी निवडणूक, यामुळे इराणची भूमिका अधिक आक्रमक बनल्याचे झरिफ म्हणाले. इराणच्या संसदेनेच अणुकराराविषयी कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून अमेरिकेला पुढच्या दोन आठवड्यांमध्ये अणुकराराबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे झरिफ यांनी बजावले आहे.

‘अमेरिकेच्या हातून वेळ निसटत चालली आहे. या अणुकराराप्रश्‍नी अमेरिका जितका विलंब करील, अमेरिकेचे तितकेच जास्त नुकसान होईल’, असे झरिफ म्हणाले. विलंबामुळे ट्रम्प यांचे अपयशी धोरणच बायडेन प्रशासनाला पुढे न्यायचे आहे, असे संकेत मिळतील, असा इशारा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

अमेरिकेला अणुकरारावरून मुदत देणार्‍या इराणने या अणुकरारातील मुद्यांचे उल्लंघन सुरू केल्याची टीका, एकेकाळी या कराराचे समर्थन करणारे युरोपिय देशही करीत आहेत. इराणने नातांझ आणि फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन करारात ठरलेल्या मर्यादेच्या पलिकडे नेण्यास सुरुवात केली आहे. तसेच इराणने संवर्धित सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. यानंतरही अमेरिका इराणच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळून अणुकरार करण्याला प्राधान्य देत आहेत.

यामुळे खवळलेल्या इस्रायलने गेल्या आठवड्यात इराणच्या अणुप्रकल्पांवर स्वबळावर हल्ले चढविण्याचा इशारा दिला होता. आपले लष्कर यासाठी सज्ज असल्याचे इस्रायलने ठणकावले होते.

इस्रायलच्या या इशार्‍याचे पडसाद इराणमध्ये उमटले आहेत. इराणवर हल्ले चढविण्याच्या घोषणा करणार्‍या इस्रायलला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असे संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त रवांची यांनी धमकावले आहे. इस्रायल फक्त धमकी देऊन थांबला नसून इस्रायलने इराणवर हल्ले चढविण्याची तयारीही केल्याचा आरोप रवांची यांनी केला. त्याचबरोबर छुपा अणुप्रकल्प राबविणार्‍या इराणचा अणुकार्यक्रम नागरी वापरासाठी कसा असू शकतो, या इस्रायलच्या सवालावरही रवांची यांनी टीका केली.

इस्रायलच्या धमक्या आणि अमेरिकेच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी इराणने अणुबॉम्ब तयार करायलाच हवा, असे इराणचे माजी राजनैतिक अधिकारी आमिर मोसावी यांनी सुचविले आहे. इस्रायल किंवा अमेरिकेने इराणविरोधात आक्रमक पावले उचलली तर इराणने आपल्यावर लादून घेतलेली मर्यादा मागे टाकून बिनदिक्कत अण्वस्त्रसज्ज बनावे, अशी मागणी मोसावी यांनी लेबेनीज वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info