चीनकडून अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी भूमिगत यंत्रणांच्या उभारणीला वेग – अमेरिकी तज्ज्ञांचा दावा

चीनकडून अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी भूमिगत यंत्रणांच्या उभारणीला वेग – अमेरिकी तज्ज्ञांचा दावा

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिका व रशियाकडून अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवणार्‍या कराराला मुदतवाढ देण्यात येत असतानाच, चीन मात्र आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्स’ची व्याप्ती वाढविण्यासाठी वेगाने हालचाली करीत आहे. चीनने आपल्या ‘इनर मंगोलिया’ प्रांतात अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी १६ भूमिगत यंत्रणांची उभारणी सुरू केली. अमेरिकी अभ्यासगट ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’मधील तज्ज्ञ हॅन्स क्रिस्टनसन यांनी ही माहिती दिली.

अण्वस्त्र

गेले दशकभर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून अमेरिकेशी बरोबरी करून जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यासाठी आर्थिक, तांत्रिक तसेच लष्करी पातळीवरील क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून अण्वस्त्रसज्जता हा त्याचाच भाग मानला जातो. कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर इतर देश साथीशी मुकाबला करण्यात व्यस्त असताना चीन मात्र आपल्या संरक्षणसामर्थ्यात भर टाकत असल्याचे समोर येत आहे. चीनकडून आण्विक पातळीवर सुरू असलेल्या हालचाली व त्यासंदर्भातील दावे याला दुजोरा देणारे ठरतात.

‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’चा भाग असलेल्या ‘न्यूक्लिअर इन्फोर्मेशन प्रोजेक्ट’चे संचालक हॅन्स क्रिस्टनसन यांनी आपल्या लेखात चीनच्या अण्वस्त्रसज्जतेकडे लक्ष वेधले. ‘इनर मंगोलिया’ प्रांतातील जिलान्ताई शहराजवळ चीनने अण्वस्त्रांची चाचणी घेण्यासाठी १६ भूमिगत यंत्रणांची (सिलोज्) उभारणी सुरू केली आहे. त्यातील ११ ‘सिलोज्’चे काम अवघ्या वर्षभरात सुरू झाले असून युद्धपातळीवर हे बांधकाम पूर्ण केले जात असल्याचे सॅटेलाईट्सवरून मिळालेल्या फोटोग्राफ्समधून दिसत आहे, असे क्रिस्टनसन म्हणाले.

चीनकडून नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘डीएफ-४१’ या अण्वस्त्रांसाठी या यंत्रणा विकसित करण्यात आल्या असाव्यात, असा दावाही क्रिस्टनसन यांनी केला. २०१९ साली झालेल्या लष्करी संचलनात चीनने ही अण्वस्त्रे पहिल्यांदा जगासमोर आणली होती. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असणार्‍या या अण्वस्त्रांचा पल्ला १४ ते १५ हजार किलोमीटर असून त्याचा वेग ध्वनीच्या तब्बल २५ पट अर्थात ‘मॅक-२५’ इतका असल्याचे सांगण्यात येते. इनर मंगोलियात उभारण्यात आलेली नवे ‘सिलोज्’ चीन या अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देणारे असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चीनकडे सध्या २०० ते ३०० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते. मात्र चीनने अधिकृत पातळीवर त्याची संख्या कधीच जाहीर केलेली नाही. तसेच चीन आपल्या लष्करी क्षमतेविषयी पारदर्शकता बाळगणारा देश म्हणून प्रसिद्ध नाही. त्यामुळेच या देशाकडील अण्वस्त्रांची संख्या सांगितली जाते, त्याहूनही अधिक असण्याची शक्यता विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. गेल्या वर्षी चीनमधील सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’मधील एका लेखात, अमेरिकेच्या सामरिक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी चीनने किमान हजार अण्वस्त्रांसह सज्ज रहावे, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, अमेरिका व रशियाप्रमाणे ‘न्यूक्लिअर ट्रायड’ क्षमता मिळविण्यासाठी चीन जोरदार हालचाली करीत असून येत्या दशकभरात चीनकडील अण्वस्त्रांचा साठा दुपटीहून अधिक वाढलेला असेल, असा इशाराही देण्यात आला होता. नोव्हेंबर २०२०मध्ये, चीनने आपल्या तीन प्रकल्पांमध्ये छुप्या रितीने अण्वस्त्रांसाठी लागणार्‍या युरेनियम व प्लुटोनियमचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु केल्याचा इशारा अमेरिकी यंत्रणांनी दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info