ड्रोनहल्ल्यांपाठोपाठ युक्रेनकडून रशियन प्रांतांमध्ये नवे हल्ले

- दहशतवादी कृत्य असल्याचा रशियन राष्ट्राध्यक्षांचा आरोप

मॉस्को/किव्ह – रशियावर एकापाठोपाठ चढविलेल्या ड्रोनहल्ल्यांनंतर युक्रेनने रशियन हद्दीत नवे हल्ले चढविले आहेत. गुरुवारी सकाळी ब्रिआंस्क च कुर्स्क प्रांतांमध्ये मॉर्टर्सच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. त्याचवेळी ब्रिआंस्क प्रांतातील दोन गावांमधील नागरिकांना युक्रेनमधून आलेल्या एका गटाने ओलिस धरल्याची घटनाही समोर आली आहे. ब्रिआंस्कमधील घटना हे दहशतवादी कृत्य असून युक्रेनमधील नवनाझी गटांनी हल्ला केल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. युक्रेन व अमेरिकेने हल्ल्यांचे वृत्त फेटाळले असून सदर घटना रशियाच्या ‘फॉल्स फ्लॅग अटॅक’चा भाग असावा, असा दावा केला आहे.

नवे हल्ले

सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस युक्रेनने रशियाच्या विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले चढविले होते. सोमवारी युक्रेन सीमेनजिक असणाऱ्या बेलगोरोद प्रांतात तीन ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. तर मंगळवारी युक्रेनने राजधानी मॉस्कोनजिक असलेल्या इंधनप्रकल्पाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारीच ब्रिआंस्क प्रांतातही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. बुधवारी रशियाच्या क्रिमिआ प्रांतात तब्बल १० ड्रोन्सच्या सहाय्याने मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

नवे हल्ले

हे सर्व हल्ले उधळण्यात आले असले तरी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याची गंभीर दखल घेतली होती. एकापाठोपाठ झालेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गुप्तचर यंत्रणांसह संरक्षणदले व इतर सुरक्षा विभागांची बैठक घेऊन अलर्टचे आदेश दिले होते. रशिया-युक्रेन सीमेवरील अनेक भागांमध्ये तैनाती वाढविण्यातही आली होती. असे असतानाही युक्रेनकडून झालेले हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

नवे हल्ले

गुरुवारी सकाळी युक्रेनच्या सीमेतून कुर्स्क प्रांतातील टेटकिनो भागात तोफा व मॉर्टर्सचा मारा करण्यात आला. यात अनेक घरे व इमारतींचे नुकसान झाले असून जीवितहानी झाल्याचीही माहिती देण्यात आली. या हल्ल्यापाठोपाठ ब्रिआंस्कमधील क्लिमोव्हस्की डिस्ट्रिक्टमधील दोन गावांवर एका युक्रेनी गटाने हल्ले चढविले. या हल्ल्यांदरम्यान गावातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला व मुलांसह काही नागरिकांना एका गावात ओलिस धरण्यात आले. रशियन गुप्तचर यंत्रणा व अंतर्गत सुरक्षा विभागाच्या तुकड्यांनी या गटाला प्रत्युत्तर दिले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

ड्रोनहल्ल्यांपाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुतिन यांनी ब्रिआंस्कमधील घटना दहशतवादी कृत्य असल्याचा आरोप केला. युक्रेनमधील नवनाझी गटांनी हा हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले. रशियन यंत्रणांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही पुतिन यांनी बजावले. युक्रेनने रशियन हद्दीत झालेल्या हल्ल्यांमागे आपला हात असल्याचे वृत्त फेटाळून लावले. अमेरिकेनेही युक्रेनच्या हद्दीतून कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा घातपाती कृत्य झाले नसल्याचे सांगितले. सदर घटना रशियाकडून घडविण्यात आलेल्या ‘फॉल्स फ्लॅग अटॅक’चा भाग असू शकतो, असा दावाही युक्रेन व अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info