वॉशिंग्टन – जसे आपण सारे युद्धाला तोंड देण्याची तयारी करतो, अगदी त्याच धर्तीवर रोगाच्या भयंकर साथीचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी. कारण भयंकर रोगाची साथ अवघ्या सहा महिन्यात तीन कोटींहून अधिक जणांचा बळी घेईल असा खळबळजनक इशारा मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांनी दिला आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स मेडिकल सोसायटी व द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन एपिडेमिक्स गोईंग व्हायरल नावाने फ्री लाईव्ह वेब इव्हेंटचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात बिल गेट्स यांनी भविष्यात येणार्या रोगांच्या साथी व त्याविरोधातील तयारी या विषयावर आपली भूमिका मांडली.
अमेरिकेसह संपूर्ण जग नव्या साथीच्या रोगाविरोधात तयारी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जर जगात तीन कोटी जणांना मारणारी शस्त्रास्त्रे तयार होत असती, तर जगातील सर्व देशांनी त्याविरोधातील तयारीसाठी वेगाने पावले उचलली असती. मात्र जैविक धोक्याविरोधातील तयारीसाठी कोणीही तातडीने हालचाली करण्यास तयार नाही, असा ठपका बिल गेट्स यांनी ठेवला. जगात लवकरच नव्या घातक रोगाची साथ येऊ घातली आहे, याची जाणीव आपल्याला इतिहास नीट लक्षात घेतला तर होऊ शकेल. ही गोष्ट येत्या दशकभरात कधीही घडू शकते आणि त्यासाठी आपण योग्य तयारी केलेली नाही. आपण पोलिओ व मलेरियासारख्या रोगांवर विजय मिळविण्यासाठी अधिक प्रगती करीत असलो तरी, रोगांच्या साथीविरोधात तयारी करण्यात आपण फारसे पुढे गेलेलो नाही, अशा स्पष्ट शब्दात गेट्स यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला याच्या धोक्याबाबत बजावले.
बिल गेट्स व त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स गेली काही वर्षे आरोग्य क्षेत्रात सक्रिय असून या क्षेत्रातील विविध उपक्रमांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य पुरविले आहे. गेट्स यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने जागतिक रोगाची साथ तसेच जैविक दहशतावादाच्या मुद्यावर गंभीर इशारे दिले असून या मुद्यावर विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याचेही समोर आले आहे.
गेल्या वर्षी गेट्स यांनी दहशतवादी जैव शस्त्राचा वापर करुन एका वर्षात किमान तीन कोटी जनतेचा बळी घेऊ शकतात, असा दावा केला होता. त्यावेळी बिल गेट्स यांनी जागतिक सुरक्षेला जैविक दहशतवादापासून असलेल्या धोक्याची कल्पनाही दिली होती. हा धोका जागतिक हवामान बदलापेक्षाही भयंकर असेल, असे गेटस् यांचे म्हणणे होते.
जैविक दहशतवाद आणि साथीच्या रोगाबाबत बिल गेटस् सातत्याने देत असलेले इशारे याबाबतचे गांभीर्य वाढविणारे आहेत. आण्विक व रासायनिक शस्त्रांच्या प्रसाराविरोधात आंतरराष्ट्रीय समुदाय अधिक संवेदनशीलता दाखवित असून सिरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सिरियावर घणाघाती हवाई हल्ले चढविले होते. पण जैविक हल्ल्याची भयावहता लक्षात घेऊन याबाबत तितकीशी जागरुकता दाखविली जात नसल्याची तक्रार काही विशेषज्ञ करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/990870614759165952 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/388501454891678 |