पोलंडच्या पंतप्रधानांचा इशारा
वॉर्सा – ‘रशियातून थेट जर्मनीला इंधनपुरवठा करणारी नॉर्ड स्ट्रीम २ इंधनवाहिनी म्हणजे नवे हायब्रिड वेपन असून त्याचा वापर रशिया नाटो व युरोपिय महासंघाला क्षीण करण्यासाठी करेल’, असा खरमरीत इशारा पोलंडच्या पंतप्रधानांनी दिला. पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये नाटोच्या ‘पार्लमेंटरी असेंब्ली’च्या बैठकीत पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनी हे वक्तव्य केले. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने, ‘नॉर्ड स्ट्रीम २’ प्रकल्प रशियाचे युरोपवरील वर्चस्व वाढविणारा ठरेल, असे बजावून त्यावर निर्बंध लादण्याचे संकेत दिले होते.
युक्रेनबरोबर दशकानुदशके सुरू असणारे वाद आणि 2014 साली झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युरोपिय देशांना करण्यात येणार्या इंधनपुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यात ‘नॉर्ड स्ट्रीम’ हा महत्त्वाचा भाग असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यरत झाला आहे. याची क्षमता ५५ अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविण्याची असून ‘नॉर्ड स्ट्रीम २’च्या माध्यमातून ही क्षमता ११० अब्ज घनमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे. यासाठी रशिया व जर्मनीत करारही झाला असून दोन्ही देशांनी प्रकल्प पुढे नेण्याची तयारी सुरू केली आहे.
मात्र पोलंड, डेन्मार्क, युक्रेनसह युरोपिय महासंघाने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला असून त्यांना अमेरिकेनेही साथ दिली आहे. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाविरोधात उघड भूमिका घेताना त्यामुळे युरोपची ऊर्जासुरक्षा व स्थैर्य धोक्यात येईल, असे बजावले होते. पोलंडने सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध केला असून युरोपच्या सुरक्षेला धोका असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. या विरोधानंतरही जर्मनीने प्रकल्प पुढे रेटल्याने अमेरिका व पोलंडने याविरोधात जोरदार आघाडी उघडल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम २’ प्रकल्पावरून उघड निर्बंधांचा इशारा दिला होता. ‘नॉर्ड स्ट्रीम २ हा प्रकल्प रशियाचे युरोपवरील वर्चस्व वाढविणारा ठरेल. हा प्रकल्पा झालाच नाही तर अमेरिकेला आनंद होईल’, अशा शब्दात अमेरिकी अधिकारी सँड्रा ऑडकर्क यांनी अमेरिकेचा तीव्र विरोध उघड केला होता. त्यापाठोपाठ आता पोलंडनेही पुन्हा एकदा आपला विरोध अतिशय आक्रमक शब्दात मांडला आहे.
पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम २’ची रशियाचे ‘हायब्रीड वेपन’ म्हणून संभावना करतानाच हा प्रकल्प युरोपच्या सुरक्षेसाठी विषाची गोळी ठरेल, असा इशाराही दिला. मात्र ‘नॉर्ड स्ट्रीम २’ या इंधनवाहिनीत अमेरिका जाणुनबुजून खोडा घालत असल्याचा आरोप जर्मनी तसेच रशियाकडून करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकी नेतृत्त्वाला लक्ष्य करीत, रशिया या प्रकल्पासाठी संघर्ष करेल, असा उघड इशारा दिला होता. तर जर्मनीचे वाणिज्यमंत्री पीटर अल्टमायर यांनी अमेरिका युरोपातील स्वतःची इंधन निर्यात वाढविण्यासाठीच ‘नॉर्ड स्ट्रीम’ला विरोध करीत असल्याचा आरोप केला.
यापूर्वी अमेरिका, नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ‘हायब्रिड वॉरफेअर’चे आरोप केले आहेत. युक्रेनमध्ये बंडखोर गटांच्या माध्यमातून सुरू असलेला संघर्ष, ‘फेक न्यूज’चा प्रसार, सायबरहल्ले, प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणार्या राजकीय गटांना समर्थन, सरकारविरोधी निदर्शने यासारख्या कारवाया करीत रशिया हे ‘हायब्रिड वॉरफेअर’ खेळत असल्याचे सांगण्यात येते. पोलिश पंतप्रधानांच्या आरोपामुळे भविष्यात रशिया इंधनाचा वापरही ‘हायब्रिड वॉरफेअर’चा भाग म्हणून करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1001444645342035968 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/399070780501412 |