पॅरिस – ‘‘‘९/११’ तसेच ‘पर्ल हार्बर’ सारख्या अमेरिकेवर झालेल्या भयंकर हल्ल्यांची आठवण करून देणारा पुढचा हल्ला म्हणजे सायबर हल्ला असेल. हा हल्ला इतका मोठा असू शकतो की तो स्वतंत्र नावाने ओळखला जाऊ शकेल’’, असा इशारा ताराह व्हिलर या सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचवेळी सायबर हल्लेखोर सातत्याने आपल्या ‘टार्गेटस्’ची संख्या वाढवित असून त्याला तोंड देणार्या यंत्रणा पुरेशा प्रमाणात तयार नसल्याचे व्हिलर यांनी बजावले आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ‘ऑर्गनायझेशन्स फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हपमेंटस्’ची (ओईसीडी) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना व्हिलर यांनी सायबर हल्ल्याचा धोका अधोरेखित केला. आधी झालेल्या सायबर हल्ल्यांच्या तुलनेत नवा सायबर हल्ला खूपच मोठा असेल आणि याला ‘९/११’ तसेच ‘पर्ल हार्बर’वरील हल्ल्यासारखी जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असे व्हिलर यांनी बजावले आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या बहुतांश यंत्रणा सायबर क्षेत्राशी निगडीत असून त्यामुळे सायबर हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढेल, असेही व्हिलर पुढे म्हणाल्या.
दरम्यान, व्हिलर यांनी सायबर हल्ल्याबाबत दिलेल्या या इशार्याला या क्षेत्रातील जाणकारांकडूनही दुजोरा दिला जात आहे. अमेरिकेचे माजी अॅडमिरल जेम्स स्टॅव्रिडीस यांनी अमेरिकेवर ‘पर्ल हार्बर’ हल्ल्याच्या तीव्रते इतका सायबर हल्ला होईल, असा दावा केला. हा हल्ला अमेरिकेच्या वीज पुरवठा करणार्या यंत्रणांवर किंवा आर्थिक क्षेत्रावर होऊ शकतो, असे स्टॅव्रिडीस यांनी बजावले आहे. एखाद्या भयंकर रोगाच्या साथीप्रमाणे आपण या सायबर हल्ल्याच्या शक्यतेसाठी तयार रहायला हवे, असे स्टॅव्रिडीस पुढे म्हणाले.
सायबर सुरक्षा क्षेत्राशी निगडीत असलेल्या इतर तज्ज्ञांनीही जबरदस्त सायबर हल्ले होतील, असे सांगून त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या यंत्रणा आपल्या सायबर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी जुनाट गोष्टींवर अवलंबून आहेत, यावरही या तज्ज्ञांचे एकमत असल्याचे दिसते. तर गेल्या दोन वर्षात अमेरिकेवर जबरदस्त सायबर हल्ले झाले होते, याची माहिती अमेरिकी यंत्रणा देऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकेच्या ‘पावर ग्रीड’वर झालेल्या सायबर हल्ल्यांमागे रशिया असल्याचा आरोप केला होता. ‘वानाक्राय’ व्हायरसच्या हल्ल्यात 150 देशांमधले तीन लाख कॉम्प्युटर्स बाधित झाले होते. यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सुमारे 30 कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यामागेही रशिया असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेवरचा पुढचा सायबर हल्ला ‘९/११’ सारखा भयंकर असेल, हा दावा अत्यंत गांभीर्याने घेतला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे होऊ शकणारे नुकसान भयंकर असेल, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. पण सायबर हल्ला झाल्यास, तो अमेरिकेवरचा हल्ला मानला जाईल व त्याला कुठल्याही मार्गाने उत्तर दिले जाऊ शकते, असे धोरण अमेरिकेने याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे अमेरिकेवरील सायबर हल्ल्यामागे एखादा देश असल्याचे उघड?झाल्यास, या देशाला अमेरिकेच्या लष्करी कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1003927700644360192 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/401546893587134 |