इराणपासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका

इराणपासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची कबुली

बर्लिन – अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देशांनी इराणबरोबर केलेल्या अणुकराराचे समर्थन करून इराणपासून कुणालाही धोका नसल्याचा दावा जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनी केला होता. पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या जर्मन दौर्‍यात चॅन्सेलर मर्केल यांनी वेगळा सूर लावला आहे. इराणपासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याचे चॅन्सेलर मर्केल यांनी मान्य केले. नेमक्या या मुहुर्तावर जर्मनीच्या गुप्तचर विभागाने इराण सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे विकसित करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.

अँजेला मर्केलइस्रायलचे पंतप्रधान तीन दिवसांच्या युरोपिय देशांच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आपला हा दौरा ‘इराण आणि इराण’ या एकाच विषयावर आधारलेला असेल, असे जाहीर केले होते. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही युरोपिय देशांनी समर्थन दिलेला इराणचा अणुकार्यक्रम आणि सिरियातील इराणच्या लष्कराची तैनाती या मुद्यावर आपण जर्मनी, फ्रान्स व ब्रिटनच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेणार असल्याचे नेत्यान्याहू यांनी जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर, सोमवारी जर्मनीमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी चॅन्सेलर मर्केल यांची भेट घेऊन इराणकडून अण्वस्त्रनिर्मिती सुरू असल्याचे ठासून सांगितले.

‘२१ व्या शतकातही इस्रायलच्या विनाशाची, साठ लाख ज्यूंना संपविण्याची घोषणा केली जाते. इराण उघडपणे आमच्या सर्वनाशाचे इशारे देत आहे. तितक्याच उघडपणे इराण या नरसंहारासाठी अण्वस्त्रांची निर्मिती देखील करीत आहे’, असे नेत्यान्याहू यांनी मर्केल यांच्याबरोबर झालेल्या पत्रकार बैठकीत सांगितले. इराणची ही अण्वस्त्रे ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या हाती सापडू शकतात, अशी भयावह शक्यताही इस्रायली पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

त्याचबरोबर, ‘आर्थिक निर्बंधांतून सवलत मिळालेल्या इराणने सिरियाला शियांपंथियांच्या प्रभावाखाली आणण्यासाठी योजना आखली आहे. यासाठीच इराणने सिरियातील संघर्षात सहभाग घेतला. सिरियातील आपल्या या योजनेत इराण यशस्वी ठरला तर सिरियामध्ये नवे धर्मयुद्ध पेट घेईल. तसे झाले तर निर्वासितांचा आणखी मोठा लोंढा युरोपवर येऊन आदळेल’, असा इशारा देऊन पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सिरियातील इराणच्या लष्करी तैनातीचा कडाडून विरोध केला.

जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनी सिरियातील इराणच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. ‘इराणचा आखातातील वाढता प्रभाव हा इस्रायलच्या सुरक्षेसाठी नक्कीच धोकादायक आहे. यामुळे इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर त्याला तोंड देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार इस्रायलला आहे. युरोपिय देश याबाबत इस्रायलच्या पाठिशी असतील. आम्ही इराणला आधीच याची कल्पना दिलेली आहे’, असे मर्केल यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणार्‍या इराणी नेत्यांच्या विधानांवरही चॅन्सेलर मर्केल यांनी नाराजी व्यक्त केली.

पण इराणचा अणुकार्यक्रम नियंत्रणात असल्याचे सांगून मर्केल यांनी इराणबरोबरच्या अणुकराराचे समर्थन केले. इराण कधीच अण्वस्त्रसज्ज होऊ नये, या इस्रायलच्या भूमिकेशी आपणही सहमत असल्याचा दावा मर्केल यांनी केला. पण अण्वस्त्रसज्ज इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेवर मतभेद असल्याचे मर्केल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा चॅन्सेलर मर्केल यांच्या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत असल्याचे दिसत आहे. इराण अजूनही सामुदायिक संहाराची शस्त्रे विकसित करीत असल्याचा दावा जर्मनीच्या गुप्तचर विभागाने केला.

हिंदी English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1004340624991010816
https://www.facebook.com/WW3Info/posts/401955503546273