आदिस अबाबा – आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणार्या वांशिक संघर्षामुळे तब्बल १२ लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. जून महिन्यात संघर्षाची तीव्रता वाढल्याने तब्बल आठ लाख जणांना बेघर व्हावे लागले असून नजिकच्या काळात ही संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
इथिओपियाच्या दक्षिण भागातील ‘गेडेओ’ व ‘वेस्ट गुजी’ या प्रांतांमध्ये इथिओपिअन सोमाली व इतर वंशाच्या नागरिकांमध्ये जमिन व इतर स्रोतांवरून संघर्ष भडकला आहे. या संघर्षामुळे फेब्रुवारी महिन्यात इथिओपियाचे तत्कालिन पंतप्रधान ‘हेलेमरिअम देसालेग्न’ यांना राजीनामा देणे भाग पडले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात ‘अॅबि अहमद’ यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र त्यांनाही वांशिक संघर्षावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे नव्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या संघर्षात अनेकांचा बळी गेला असून विस्थापित होणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही संघर्ष टाळण्यात अपयश आल्याने दक्षिण इथिओपियात लष्कर तैनात करण्यात आले आहे. मात्र लष्कराच्या तैनातीनंतरही हिंसाचारात घट झाली नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
इथिओपिया आफ्रिका खंडातील दुसर्या क्रमांकाचा मोठा देश म्हणून ओळखण्यात येतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |