अमेरिका उत्तर कोरियाला लक्ष्य करण्याच्या तयारीत – उत्तर कोरियन राजवटीच्या मुखपत्राचा आरोप

अमेरिका उत्तर कोरियाला लक्ष्य करण्याच्या तयारीत – उत्तर कोरियन राजवटीच्या मुखपत्राचा आरोप

प्योनगँग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा नियोजित उत्तर कोरिया दौरा रद्द करण्याची घोषणा केली होती. उत्तर कोरियातील ‘किम जॉंग-उन’ यांच्या हुकूमशाही राजवटीने यावर थेट आक्रमक प्रतिक्रिया नोंदविली नसली, तरी या राजवटीच्या मुखपत्राने अमेरिका उत्तर कोरियावर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा ठपका ठेवला आहे. यासाठी जपानच्या ओकिनावा बेटाजवळ अमेरिकेच्या लष्करी हालचाली सुरूही झाल्या आहेत, असा दावा या मुखपत्राने केला आहे.

उत्तर कोरियन राजवट, आरोप , किम जॉंग-उन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, अण्वस्त्रमुक्त, अमेरिका, जपानकाही आठवड्यांपूर्वी सिंगापूर येथे झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जॉंग-उन’ चर्चेनंतर या देशाची आण्विक समस्या सुटत असल्याचे दिसू लागले होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण पुन्हा ‘किम जॉंग-उन’ यांना भेटू शकतो, असे संकेत दिले होते. मात्र उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याची प्रक्रिया अपेक्षित वेग घेत नसल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला. यामुळे आपण परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा उत्तर कोरिया दौरा रद्द करण्याचे आदेश देत असल्याचे ट्रम्प यांनी घोषित करून टाकले. तसेच चीनकडूनही उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. त्यांच्या या निर्णयावर दक्षिण कोरिया आणि चीनने नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर कोरियन राजवटीने ट्रम्प यांच्या या निर्णयावर उघडपणे जहाल प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र याबाबतची आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, याची तजवीज या राजवटीने केली. सदर राजवटीचे मुखपत्र मानल्या जाणार्‍या ‘रेदॉंग सिन्मुन’ नावाच्या वर्तमानपत्राने अमेरिका उत्तर कोरियाबरोबर चर्चेच्या नावाखाली वेगळाच डाव खेळत असल्याचा आरोप केला. वरकरणी चेहर्‍यावर स्मित ठेवून अमेरिका उत्तर कोरियाशी चर्चेचा बनाव करीत आहे. पण प्रत्यक्षात अमेरिका उत्तर कोरियावर चढाईची तयारी करीत आहे, असे सांगून या वर्तमानपत्राने अमेरिकेवर दुटप्पीपणाचा ठपका ठेवला आहे.

जपानच्या ओकिनावा बेटाजवळील अमेरिकेच्या लष्करी तळावरील हालचालींचा उल्लेख करून या हालचाली उत्तर कोरियाला लक्ष्य करण्यासाठीच सुरू असल्याचे दावे ‘रेदॉंग सिन्मुन’ने केले आहेत. मात्र ही माहिती कुठून मिळाली, याबाबत ‘रेदॉंग सिन्मुन’ने खात्रीलायक स्पष्टीकरण दिलेले नाही. जपानच्या ओकिनावा बेटावर अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. या तळावर सुमारे ४७ हजार अमेरिकन जवान तैनात आहेत. या तळावर सातत्याने लष्करी सरावांचे आयोजन केले जाते. तसेच इथे मोठ्या प्रमाणात लष्करी हालचालीही सुरू असतात. यापैकी कुठल्या सराव अथवा लष्करी हालचालींचा उल्लेख करून ही उत्तर कोरियाला लक्ष्य करण्याची तयारी आहे, याचाही संदर्भ ‘रेदॉंग सिन्मुन’ने दिलेला नाही.

मात्र असे असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला, या घटनेकडे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक गांभीर्याने पाहत आहेत. शिवाय हा निर्णय घोषित करीत असताना, ट्रम्प यांनी चीनवर केलेली टीका लक्षवेधी ठरते. म्हणूनच नजिकच्या काळात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांचा प्रश्‍न पुन्हा उग्ररूप धारण करू शकतो, असे संकेत मिळू लागले आहेत.

 English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info