मॉस्को – ‘सिरियाच्या इदलिबमधील दहशतवादी हे शरीराला लागलेल्या गळूसारखे आहेत. त्यांना नष्ट करणे आवश्यक बनले आहे. इदलिबमध्ये ही कारवाई सुरू असताना इतर कुणीही अडथळा निर्माण करू नये’, असा सज्जड इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा देताना कुठल्याही देशाचे नाव घेतले नसले तरी इदलिबमधील कारवाईला विरोध करणार्या अमेरिका व युरोपिय मित्रदेशांना रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी धमकावल्याचे दिसते. दरम्यान, रशियन युद्धनौकांचा ताफा भूमध्य समुद्रात दाखल झाला असून सिरियन लष्करानेही इदलिबला वेढा घातला आहे. पुढच्या २४ तासात इथे घनघोर संघर्ष पेट घेईल, असे संकेत रशियाकडून दिले जात आहेत.
सिरियामध्ये रासायनिक हल्ल्याचे चित्र उभे करण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांनी कट आखल्याचा आरोप रशिया करीत आहे. यानंतर सिरियातील अस्साद राजवटीवर या हल्ल्याचे खापर फोडून लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांच्या युद्धनौका तसेच लष्कर सज्ज बसले आहे. पाश्चिमात्य मित्रदेशांची सुमारे ७० लष्करी वाहने सिरियातील हल्ल्यासाठी तयार असल्याचा ठपका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्ह यांनी ठेवला. यामध्ये भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘युएसएस रॉस’ व सहाय्यक युद्धनौकांचा समावेश असून सुमारे ३८० क्षेपणास्त्रे सिरियाच्या दिशेने रोखल्याचा दावा झाखारोव्हा यांनी केला.
अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ रशियाचे हे आरोप फेटाळत असतानाच रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी अमेरिका व मित्रदेशांना उद्देशून इशारा दिला. सिरियाच्या उत्तरेकडील इदलिबमधील दहशतवाद्यांविरोधातील कारवाईची तयारी पूर्ण झाल्याचे लॅव्हरोव्ह यांनी जाहीर केले. ‘सिरियातील दहशतवाद्यांचा शेवटचा तळ इदलिब येथे असून हे दहशतवादी गेल्या वर्षी या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या संघर्षबंदीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. इदलिबमधील जनतेला मानवी ढाल करुन दहशतवादी पळ काढण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे दहशतवादी म्हणजे गळूसारखे असून त्यांना नष्ट करणे ही नैतिक जबाबदारी ठरते’, असे लॅव्हरोव्ह म्हणाले.
पाश्चिमात्य देश बंडखोरांच्या चिथावणीला बळी पडून इदलिबमधील दहशतवादविरोधी कारवाई रोखणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे लॅव्हरोव्ह म्हणाले. सिरियाच्या किनारपट्टीजवळ रशियाच्या १३ विनाशिका आणि दोन पाणबुड्यांचा ताफा दाखल झाल्यानंतर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही घोषणा करून पाश्चिमात्य देशांना इशारा दिल्याचा दावा युरोपमधील विश्लेषक व आघाडीची माध्यमे करीत आहेत. तर भूमध्य समुद्रात दाखल झालेल्या आणि कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या रशियन युद्धनौकांमुळे सिरियातील परिस्थिती बिघडणार नाही अशी अपेक्षा असल्याचा टोला ‘नाटो’च्या प्रवक्त्या ‘ओआना लुंगेसू’ यांनी लगावला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |