केम्निट्झ – इराक आणि सिरियातून आलेल्या निर्वासितांनी जर्मन नागरिकाला भोसकून ठार केल्यानंतर, केम्निट्झ शहरात कमालीचा तणाव पसरला आहे. जर्मनीतील उजव्या गटांबरोबर निर्वासितांना विरोध करणार्या गट व पक्षांनी एकजूट करून निदर्शने सुरू केली आहेत. शनिवारी झालेल्या या निदर्शनांच्या विरोधात निर्वासितांचे समर्थन करणारे उदारमतवादीही रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे केम्निट्झमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
जर्मनीच्या केम्निट्झमधल्या ‘स्ट्रीट फेस्टिव्हल’ दरम्यान डॅनिअल हिलिग नावाच्या ३५ वर्षाच्या नागरिकावर इराक व सिरियातून आलेल्या निर्वासित तरुणांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात आणखी दोघे स्थानिक जखमी झाले आहेत. हिलिग या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. यानंतर केम्निट्झमध्ये निर्वासितांच्या विरोधात असंतोषाचा उद्रेक झाला. उजव्या गटांनी रस्त्यावर उतरून चॅन्सेलर मर्केल यांनी निर्वासितांबाबत स्वीकारलेल्या धोरणांचा निषेध केला. यासाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे समोर आले होते. तसेच उजव्या गटाच्या समर्थकांनी काही निर्वासितांवर हल्ले चढविल्याचे वृत्त होते.
काही ठिकाणी तर उजव्या गटाचे समर्थक व निर्वासितांचा जमाव यामध्ये दंगली झाल्याचे समोर आले होते. याचा फार मोठा ताण केम्निट्झच्या सुरक्षा यंत्रणेवर पडला होता. शनिवारीही उजव्या गटाच्या समर्थकांनी हिलिग याच्या खूनाच्या निषेधार्थ निदर्शने आयोजित केली होती. यावेळी सुमारे आठ हजाराहून अधिक निदर्शक मर्केल यांच्या सरकारविरोधात तसेच निर्वासितांच्याही विरोधात आक्रमक घोषणा देत होते. यामध्ये ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ (एएफडी) या उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षाबरोबर ‘पेगिडा’ या निर्वासितांना प्रखर विरोध करणार्या गटाचाही समावेश होता.
उजव्या गटाचे समर्थक निर्वासितांना विरोध करीत असल्याचे पाहून उदारमतवाद्यांनी याला आव्हान देण्यासाठी निदर्शने सुरू केली होती. या दोन्ही जमावामध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी सुमारे १२०० हून अधिक जर्मन पोलीस तैनात करण्यात आले होते. या ठिकाणी हिंसाचाराचे वृत्त आले नसले तरी पुढच्या काळात या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पेट घेईल, अशी भीती यंत्रणांना वाटत आहे. म्हणूनच केम्निट्झच्या मेअर बार्बरा लुडविंग यांनी शहरात आणीबाणी घोषित केली आहे.
या निदर्शनांचे धक्के जर्मनीच्या सरकारला बसू लागले आहेत. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री मास यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली असून जर्मनीच्या जनतेने उजव्या गटाच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे. आत्ताच्या पिढीला स्वातंत्र्य काहीही न करता मिळालेले आहे. म्हणूनच वर्णद्वेषी विचारसरणीच्या विरोधात खडे ठाकताना किंवा त्याविरोधात भूमिका घेताना जनता आळस करीत आहे, अशी टीका परराष्ट्रमंत्री मास यांनी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |