मॉस्को/दमास्कस – लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली रशियाची ‘एस-३००’ हवाई सुरक्षायंत्रणा सिरियात दाखल झाली. सध्या रशियन लष्करच या यंत्रणेचा वापर करणार असल्याचे रशियाने घोषित केले. दोन आठवड्यांपूर्वी सिरियाच्या लताकिया भागात रशियन लष्कराचे विमान इस्रायलमुळे कोसळल्याचा आरोप रशियाने केला होता. ‘एस-३००’ सिरियात पाठवून रशियाने यापुढे सिरियावरील इस्रायलचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असे बजावले आहे.
१७ सप्टेंबर रोजी सिरियाच्या लताकियामध्ये रशियन विमानावर झालेल्या हल्ल्याला इस्रायलच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून रशियाने सिरियात ‘एस-३००’ तैनात करण्याची घोषणा केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सुरुवातीला काही दुर्दैवी घटनाक्रमांमुळे रशियाचे विमान कोसळल्याचे सांगून इस्रायल यासाठी जबाबदार नसल्याचे म्हटले होते. पण आपल्या विमानावर झालेल्या हल्ल्याला रशिया नक्कीच प्रत्युत्तर देईल व रशियाचे हे प्रत्युत्तर प्रत्येकाला पाहता येईल, असे सूचक उद्गार पुतिन यांनी काढले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रशियाची ‘एस-३००’ सिरियात दाखल झाली.
रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी ‘एस-३००’ या यंत्रणेच्या सिरियातील ‘डिलिव्हरी’ची माहिती उघड केली. सिरियातील रशियन जवानांच्या सुरक्षेसाठी सदर यंत्रणा सिरियात तैनात असेल, असे संरक्षणमंत्री शोईगू यांनी सांगितले. ‘एस-300’ यंत्रणेचे एकूण ४९ सुटे भाग सिरियात दाखल झाले असून यामध्ये ‘एस-३००’च्या चार लाँचर्स, रडार आणि इतर साहित्यांचा यामध्ये समावेश आहे.
पण ही यंत्रणा अपूर्ण असल्याचा दावा रशिया करीत आहे. रशिया सिरियाला देत असलेल्या ‘संघटीत हवाई सुरक्षा यंत्रणे’चा हा एक भाग असून पुढच्या पंधरवड्यात सिरिया या यंत्रणेने पूर्णपणे सज्ज होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री शोईगू यांनी दिली. तसेच पुढील तीन महिन्यात रशिया सिरियन लष्कराला या यंत्रणेच्या वापरासाठी प्रशिक्षित होतील. तोपर्यंत ‘एस-३००’चा वापर करण्याचे अधिकार सिरियामध्ये तैनात रशियन जवानांकडे असतील.
या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीसाठी इराणने सिरियातील ‘टी-४’ हा आपला हवाईतळ पुरविल्याची माहिती इराणी दैनिकाने प्रसिद्ध केली. इराणने सदर तळातून माघार घेतली असून रशियन यंत्रणा व जवान या तळाचा ताबा घेतील, असे या इराणी दैनिकाने म्हटले आहे. सिरियाची राजधानी दमास्कसपासून काही अंतरावर असलेल्या या ‘टी-४’ हवाईतळावर इराणने क्षेपणास्त्रे व इतर शस्त्रसाठा लपविल्याचा आरोप करून इस्रायलने गेल्या वर्षभरात तीन वेळा हल्ले चढविले होते. या पार्श्वभूमीवर, सदर लष्करी तळावर रशियाने ‘एस-३००’ तैनात करण्यात येणार असून हा इस्रायलसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.
सिरियाची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी सदर यंत्रणा पुरविली असून यासाठी रशियाने अस्साद राजवटीकडून किंमत घेतली नसल्याचा दावा युरोप व इस्रायलमधील काही विश्लेषक करीत आहेत. सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने सदर यंत्रणा थेट दमास्कसजवळ तैनात केल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. सिरियाने याआधीच रशियाच्या ‘एस-३००’च्या तैनातीचे समर्थन करताना इस्रायलला इशारा दिला होता. यापुढे सिरियावर हल्ला चढविण्याआधी इस्रायलला फेरविचार करावा लागेल, असे सिरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |