अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशिया भेटीवर

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशिया भेटीवर

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन शनिवारी रशिया भेटीवर दाखल झाले आहेत. अमेरिका व रशियाबरोबरील अण्वस्त्र करारातून माघार घेण्याची तयारी करीत असतानाच, बोल्टन यांच्या या रशिया दौर्‍याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. बोल्टन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान उत्तर कोरियावरील निर्बंध व इतर मुद्यांवरही चर्चा होईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

अवघ्या २४ तासांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, रशियावर अणुहल्ला झाल्यास सार्‍या जगाचा विनाश होईल, अशी धमकी दिली होती. त्यापूर्वी रशिया व अमेरिकेदरम्यान अण्वस्त्रांच्या संख्येत घट करण्याबाबत नव्या करारावरून वाद पेटल्याचे समोर आले होते. अमेरिकेने रशिया नवी छोट्या पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित करीत असल्याचा आरोप करून त्याला अमेरिकेकडून कठोर व आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले होते. त्यानंतर रशियाने अमेरिका नव्या करारासाठी उत्सुक नसून सतत अडथळे आणत असल्याचा आरोप केला होता.

बोल्टन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिका व रशियामधील अण्वस्त्र करार रद्द करावा यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हीच भूमिका बोल्टन रशियासमोर मांडतील, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिका व रशियामधील संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होत आहेत. युक्रेनमधील संघर्ष, अमेरिकेच्या निवडणुकांमधील कथित हस्तक्षेप व सिरियातील अस्साद राजवटीला समर्थन यासारख्या मुद्यांमुळे अमेरिका व रशियात वाद सुरू आहेत. त्यात आता अण्वस्त्र कराराची भर पडली आहे. दोन्ही देशांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने संघर्ष भडकण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

अण्वस्त्रांच्या मुद्याबरोबरच सुरक्षा सल्लागार बोल्टन उत्तर कोरियाबाबतची अमेरिकेची भूमिकाही रशियासमोर मांडतील, असा दावा करण्यात येतो. रशिया व चीन उत्तर कोरियावरील निर्बंध उठविण्याची मागणी करीत आहेत. मात्र अमेरिकेने निर्बंध कायम ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. रशियातील काही माध्यमांनी बोल्टन यांचा रशिया दौरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील संभाव्य भेटीची पूर्वतयारी असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, सिंगापूरमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. संरक्षणमंत्री मॅटिस यांनी रशियन संरक्षणमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info