युरोपिय देशांसह जपान व रशियात ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ – लाखो पक्ष्यांची कत्तल

पक्ष्यांची कत्तल

लंडन/टोकियो – कोरोनाच्या साथीतील रुग्णांची संख्या २५ कोटींवर जात असतानाच काही आघाडीच्या देशांना ‘बर्ड फ्ल्यू’च्या रुपात दुहेरी संकटाचा फटका बसला आहे. युरोपातील १० प्रमुख देशांसह जपान तसेच रशियात ‘बर्ड फ्ल्यू’ची मोठी साथ आली असून लक्षावधी पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडले आहे. या साथीमुळे कोरोनातून पूर्वपदावर येणार्‍या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी चीनमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’च्या मानवी संसर्गाची २१ प्रकरणे समोर आली असन त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून (डब्ल्यूएचओ) देण्यात आली.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून युरोपच्या काही भागांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग आढळण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे उघड होत आहे. युरोपातील सर्वात मोठा पोल्ट्री उत्पादक म्हणून ओळखण्यात येणार्‍या पोलंडमध्ये एकापाठोपाठ एक ‘बर्ड फ्ल्यू’चे उद्रेक समोर येत आहेत. आतापर्यंत देशात पाच मोठ्या उद्रेकांची नोंद झाली असून चार उद्रेक टर्की पक्ष्यांच्या फार्म्समध्ये, तर एक कोंबड्यांच्या फार्ममध्ये झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे पोलंडमधील सुमारे साडेसहा लाख पक्ष्यांची कत्तल करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पक्ष्यांची कत्तल

ब्रिटनच्या मध्य इंग्लंड भागासह, पूर्व स्कॉटलंड तसेच वेल्स प्रांतात ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आल्याची नोंद झाली आहे. सरकारने संपूर्ण देशभरात ‘ऍव्हिअन इन्फ्लुएन्झा प्रिव्हेंशन झोन’ जाहीर केला असून जैवसुरक्षाविषयक निकष कठोर करण्यात आले आहेत. फ्रान्सच्या ईशान्य भागात साथीची नोंद झाली असून देशभरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जर्मनीतील तीन भागांमध्ये वेगवेगळ्या फार्म्सवर ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव झाल्याची माहिती देण्यात आली. युरोपातील सुमारे १० प्रमुख देशांमध्ये सध्या ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ पसरली असून त्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व पोलंडसह डेन्मार्क, इटली, नेदरलॅण्ड, झेक रिपब्लिक, बेल्जियम व फिनलंडचा समावेश आहे.

पक्ष्यांची कत्तल

युरोपिय देशांव्यतिरिक्त जपान व रशियामध्येही ‘बर्ड फ्ल्यू’ची व्याप्ती वाढताना दिसत आहे. जपानच्या अकिता प्रांतात ‘बर्ड फ्ल्यू’ची मोठी साथ आली असून सुमारे दीड लाख कोंबड्यांची कत्तल करणे भाग पडले आहे. संसर्ग झालेल्या फार्म्सपासून १० किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. रशियाच्या ‘किरोव्ह रिजन’मध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ पसरली असून १० जिल्ह्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसात २३० टन ‘पोल्ट्री’ नष्ट करण्यात आल्याची माहिती स्थानिक पशुवैद्यकीय विभागाने दिली.

दरम्यान, चीनमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’च्या ‘एच५एन६’ विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत. २१ नागरिकांना हा संसर्ग झाला असून त्यात सहाजणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्या इतर रुग्णांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षी अशा संसर्गाची पाचच प्रकरणे आढळली होती. मात्र यावर्षी त्यात वाढ झाल्याने ‘डब्ल्यूएचओ’कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात युरोप व आशियाई देशांना सातत्याने ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी २०१४ तसेच २०१६ सालीही युरोपमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या नव्या साथीने संकटाची व्याप्ती अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी युरोप व आशियात ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीमुळे जवळपास एक कोटी पक्ष्यांचा बळी गेला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info