युक्रेन युद्धात अमेरिकेचा थेट सहभाग आहे

- रशियाचा घणाघाती आरोप

युक्रेन युद्धात

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका थेट सहभागी आहे, असा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. युक्रेनच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने ब्रिटीश माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम्स’चे हल्ले कुठे करायचे यासाठी अमेरिका माहिती पुरविते असे वक्तव्य केले होते. याचा आधार घेत रशियाने अमेरिकेवर युक्रेन युद्धातील प्रत्यक्ष सहभागाचा ठपका ठेवला. रशियन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच संरक्षण मंत्रालयानेही अमेरिकेचा सहभाग असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

युक्रेन युद्धात

युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्सचे उपप्रमुख वादिम स्किबिट्स्की यांनी नुकतीच ब्रिटीश माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अमेरिकी संरक्षणयंत्रणांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘हायमार्स’सारख्या यंत्रणेतून होणाऱ्या हल्ल्यांसाठी लक्ष्य कसे निवडले जाते व कोणत्या उपग्रहांकडून माहिती मिळते, असा सवाल करण्यात आला होता. त्याचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. पण हल्ले करण्यापूर्वी अमेरिकी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा होते आणि अमेरिकी अधिकाऱ्यांना नकाराधिकाराचे हक्क आहेत, असे स्किबिट्स्की यांनी सांगितले. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हे वक्तव्य आल्यानंतर रशियाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली. ‘युक्रेनमधील संघर्षात अमेरिकेचा थेट सहभाग आहे, हे दाखविण्यासाठी याहून वेगळ्या पुराव्याची गरज नाही. अमेरिका युक्रेनला केवळ प्र्रशिक्षण व शस्त्रेच पुरवित नाही तर शस्त्रांचा वापर करण्यातही त्यांचा सहभाग आहे. अमेरिकी अधिकारी किती दूरवर आहेत ही बाब इथे महत्त्वाची ठरत नाही. ते युक्रेनच्या संरक्षणदलांना मार्गदर्शन करीत आहेत व लक्ष्य निवडण्यासाठी सहाय्यदेखील करीत आहेत’, अशा शब्दात परराष्ट्र विभागाच्या प्र्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडले.

युक्रेन युद्धात

रशियाच्या संरक्षण विभागानेही याला दुजोरा देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘व्हाईट हाऊस व अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी युक्रेनी अधिकाऱ्याच्या वक्तव्याने अमेरिकेचा युक्रेनमधील संघर्षात असलेला थेट सहभाग उघड झाला आहे’, असा ठपका रशियन संरक्षण विभागाने ठेवला. पूर्व युक्रेनमधील रशियन नियंत्रित क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये होणारे क्षेपणास्त्र हल्ले व त्यात होणाऱ्या मनुष्यहानीसाठी बायडेन प्रशासन जबाबदार आहे, असेही रशियाने रशियाने पुढे म्हटले आहे.

2014 साली रशिया व युक्रेनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला आठ अब्ज डॉलर्सहून अधिक संरक्षणसहाय्य पुरविल्याचे सांगण्यात येते. रशियाविरोधातील संघर्ष सुरू असेपर्यंत अमेरिका युक्रेनला शस्त्रसहाय्य पुरवेल, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिले असून त्यासाठी 50 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र असे असूनही अमेरिका आपण रशिया-युक्रेन युद्धात थेट सहभागी नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत होती. युक्रेनी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे यासंदर्भातील अमेरिकेचे पितळ उघडे पडल्याचे दिसते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info