Breaking News

‘जी-20’ मध्ये चीनबरोबर तोडगा न निघाल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या संपूर्ण निर्यातीला लक्ष्य करणार

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिका व चीनच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान ‘जी20’ परिषदेत होणार्‍या चर्चेत व्यापारयुद्धावर तोडगा निघाला नाही तर चीनकडून अमेरिकेत करण्यात येणार्‍या संपूर्ण निर्यातीवर कर लादण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकार्‍यांनी हे वृत्त दिले असून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला करांची घोषणा होईल, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेला व्यापारयुद्धाचे मोठे फटक बसत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यात नव्या करांची भर पडल्यास चीनच्या सत्ताधारी राजवटीला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असे दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, निर्यातीवर कर लादण्याची तयारी, G-20, चिनी निर्यात, व्यापारयुद्ध, world war 3, अमेरिका, चीन, WTO, IMF30 नोव्हेंबरला अर्जेंटिनामध्ये ‘जी20’ गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अमेरिका व चीन दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवरही चर्चा होणार असून त्यात व्यापारयुद्धाला प्राधान्य असेल, असे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापारी करार होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र चीनकडून त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारयुद्धात तडजोड करण्यासाठी चीनकडून करण्यात आलेले सर्व प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. चीनने आपल्या व्यापारी पद्धतींमध्ये बदल घडवावा व बुद्धिसंपदा हक्कांची चोरी थांबवावी, या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या आहेत. त्या मान्य झाल्या तरच पुढील चर्चा होऊ शकते, अशी आक्रमक भूमिका अमेरिकेकडून घेण्यात आली आहे. मात्र चीन अमेरिकेकडून लादलेल्या करांच्या मुद्यावर चर्चा करण्याचा आग्रह धरीत असून ट्रम्प यांनी चीनची भूमिका सपशेल फेटाळली आहे.

त्याचवेळी अमेरिकेकडून चीनच्या 250 अब्ज डॉलर्सहून अधिक निर्यातीवर लादण्यात आलेल्या करांचा मोठा फटका चिनी अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या निर्यात व औद्योगिक उत्पादन या दोन्ही क्षेत्रांची गती मंदावली असून त्याचे परिणाम आर्थिक विकासावर होत असल्याचे दिसत आहे. व्यापारयुद्ध सुरू झाल्यानंतर सलग दोन तिमाहींमध्ये चीनचा आर्थिक विकास दर घसरत असून ‘युआन’ चलनाच्या मूल्यातही विक्रमी घसरण झाली आहे.

अमेरिकेने चीनच्या एकूण निर्यातीच्या तुलनेत सुमारे 50 टक्के चिनी निर्यातीवर निर्बंध लादल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, नव्या करांचे संकट मोठा धक्का ठरेल, याचे स्पष्ट संकेत देणारा आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या तुलनेत चीनकडे प्रत्युत्तरासाठी फारसे पर्याय नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अमेरिकेने सुमारे 500 अब्ज डॉलर्सच्या चिनी निर्यातीवर निर्बंध लादल्यास चीनच्या सत्ताधारी राजवटीला नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल, असे सांगण्यात येत आहे.

त्याचवेळी अमेरिका व चीनदरम्यान पूर्ण क्षमतेने व्यापारयुद्ध भडकल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचे गंभीर पडसाद उमटतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक व्यापार संघटनेने यापूर्वीच दिला आहे. हे व्यापारयुद्ध जगाला नव्या आर्थिक मंदीत ढकलणारे ठरेल, अशी भीतीही त्यात व्यक्त करण्यात आली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info