मॉस्को/संयुक्त राष्ट्रसंघ – रशियाने क्रिमिआ प्रांतानजिक असणार्या ‘कर्श सामुद्रधुनी’त घुसलेल्या तीन युक्रेनियन बोटींना ताब्यात घेतले आहे. रशियाच्या या कारवाईमुळे रशिया व युक्रेनमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला असून युक्रेनने आपल्या लष्कराला ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही देशांकडून आक्रमक हालचाली सुरू झाल्याने इथे संघर्ष पेटू शकतो, याची जाणिव झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाने सोमवारी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक आयोजित केली आहे.
रविवारी युक्रेनच्या नौदलाच्या दोन गनबोट्स व एक टगबोट क्रिमिआनजिक असणार्या कर्श सामुद्रधुनीतून ‘अॅझोव्ह सी’मध्ये दाखल झाल्या. या सागरी क्षेत्रातील ‘मारिपोल’ बंदराला भेट देण्यासाठी या बोटी जात असल्याचा दावा युक्रेनने केला. रशियन यंत्रणांना याबाबत योग्य सूचना दिली होती, असे युक्रेनच्या नौदलाने स्पष्ट केले. मात्र रशियाने युक्रेनचे दावे फेटाळले आहेत.
‘युक्रेनच्या बोटी सूचना न देता रशियन सागरी हद्दीत आल्या होत्या. त्यांनी नियोजित प्रक्रिया पार पाडली नाही. सूचना दिल्यानंतरही युक्रेनच्या बोटी रशियन हद्दीतून बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केली’, असे रशियन अधिकार्यांनी सांगितले. कारवाईबाबत प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये रशियन तटरक्षक दलाच्या बोटीने युक्रेनच्या टगबोटीला जोरदार धडक दिल्याचे दाखविण्यात आले आहे.
यावेळी रशियाकडून युक्रेनच्या बोटींवर जोरदार गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात युक्रेनचे काही सैनिक जखमी झाले आहेत. यावेळी रशियाने काही काळ आपली लढाऊ विमाने कर्श सामुद्रधुनीच्या भागात तैनात केल्याचेही समोर आले आहे. रविवारी युक्रेनच्या बोटींवर केलेल्या कारवाईनंतर रशियाने काही काळासाठी सामुद्रधुनीचा मार्ग बंद केला होता. मात्र सोमवारी हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती रशियन अधिकार्यांनी दिली.
युक्रेनच्या बोटी ताब्यात घेतल्यानंतर रशियाने हा प्रकार जाणूनबुजून चिथावणी देण्याच्या हेतूने घडविण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी रशिया युक्रेनच्या राजनैतिक अधिकार्यांना समन्स धाडेल, असा इशाराही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. रशियाच्या संसद सदस्यांनी, युक्रेनने आपल्या ‘पाश्चिमात्य मालकांच्या’ आदेशावरून हे चिथावणीखोर कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
मात्र युक्रेनने पलटवार करताना रशियावर गंभीर आरोप लावले आहेत. रशियाने भडका उडविण्याच्या उद्देशानेच गोळीबार करून बोटीला धडक दिली व त्या ताब्यात घेतल्या, असा दावा युक्रेनने केला. रशियाच्या कारवाईमुळे या क्षेत्रात पुन्हा एकदा लष्करी संघर्ष भडकण्याची भीती युक्रेनने व्यक्त केली असून लष्कराला ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांची संसदेचे अधिवेशन बोलवले असून ‘मार्शल लॉ’ लागू करण्याच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात येणार आहे. रशियाने केलेल्या कारवाईचे पडसाद युक्रेनच्या राजधानीतही उमटले असून युक्रेनमधील निदर्शकांनी रशियन दूतावासावर हल्ल्याचा प्रयत्न करून गाड्यांची जाळपोळ केली.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या बोटींनी घुसखोरी केल्याचा आरोप करून या मुद्यावर सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील दूत निक्की हॅले यांनी याला दुजोरा दिला असून सोमवारी सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. गेल्याच महिन्यात युक्रेनच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी, रशियाने ‘अॅझोव्ह सी’मध्ये नौदलाच्या हालचाली वाढविल्या असून त्या नियमांचे उल्लंघन करणार्या असल्याचा आरोप केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |