कॅनबेरा/रामल्ला – आंतरराष्ट्रीय स्तरातून होत असलेल्या टीकेची पर्वा न करता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पश्चिम जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याचे मान्य केले. संयुक्त राष्ट्रसंघ तसेच युरोपिय मित्रदेशांकडून वारंवार धमकावल्या जाणार्या इस्रायलची साथ देणे हे ऑस्ट्रेलियाचे कर्तव्य असल्याचे सांगून पंतप्रधान मॉरिसन यांनी ही घोषणा केली. पण अमेरिकेप्रमाणे ऑस्ट्रेलिया पश्चिम जेरूसलेममध्ये आपला दूतावास हलविण्याची घाई करणार नसल्याचे मॉरिसन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या या निर्णयाचे पडसाद उमटू शकतात, हे ओळखून पंतप्रधान मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना इंडोनेशियाचा प्रवास टाळण्याची सूचना केली आहे.
पंतप्रधान मॉरिसन यांनी शनिवारी सकाळी पश्चिम जेरूसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन सरकारचा हा निर्णय द्विराष्ट्रवादाच्या योजनेला आणि संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या नियमांना अनुसरून असल्याचे मॉरिसन म्हणाले. पश्चिम जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केले असले तरी सध्या ऑस्ट्रेलियाचा दूतावास तेल अविवमध्येच असेल. पण ऑस्ट्रेलियाचे संरक्षण व व्यापारविषयक कार्यालय पश्चिम जेरूसलेममध्ये हलविण्यात येईल, असे पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले.
त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चा यशस्वी होत नाही तोपर्यंत दूतावास पश्चिम जेरूसलेममध्ये हलविणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा व पूर्व जेरूसलेम पॅलेस्टाईनची राजधानी या ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही मॉरिसन यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करणार असल्याची माहिती शुक्रवारीच प्रसिद्ध झाली होती. पण त्यांनी केवळ पश्चिम जेरूसलेम इस्रायलची राजधानी घोषित केल्यामुळे इस्रायली माध्यमे आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या या निर्णयावर पॅलेस्टाईनच्या अब्बास सरकारने जोरदार टीका केली आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा हा निर्णय बेजबाबदार असल्याचा आरोप पॅलेस्टिनी नेते साएब एरेकत यांनी केला. पंतप्रधान मॉरिसन यांनी हा निर्णय घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा एरेकत यांनी केला. तर ऑस्ट्रेलियाचा शेजारी आग्नेय आशियाई देश इंडोनेशियानेही पंतप्रधान मॉरिसन यांच्या निर्णयावर टीका करून ऑस्ट्रेलियाबरोबर असलेले राजकीय सहकार्य तोडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे इंडोनेशियातील पॅलेस्टाईनच्या कडव्या समर्थकांकडून ऑस्ट्रेलियन पर्यटकांच्या जीवाला धोका असून नागरिकांनी इंडोनेशियाचा प्रवास टाळावा, अशी सूचना ऑस्ट्रेलियन सरकारने केली आहे.
वर्षभरापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केले होते. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यातच अमेरिकेने जेरूसलेममध्ये आपला दूतावास हलविला होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. युरोपमधील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांनीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयावर आगपाखड केली. तसेच जेरूसलेमच्या मुद्यावर इस्रायलचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे युरोपिय देश व इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला होता.
इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |