दमास्कस – सिरियाच्या उत्तरेकडील भागात तणाव वाढला असून कुर्दांच्या आवाहनानंतर सिरियन लष्कराने मनबिज प्रांताचा ताबा घेतला. तसेच संयुक्तरित्या दहशतवादविरोधी संघर्षात सहभागी होण्याचे सिरियन लष्कर आणि कुर्दांनी मान्य केले आहे. पण सिरियन लष्कराने मनबिजमधील आपल्या तैनातीची घोषणा केल्यानंतर पुढच्या काही मिनिटात अमेरिकेचे हेलिकॉप्टर मनबिजच्या हवाई क्षेत्रात घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.
सिरियन लष्कराने शुक्रवारी सकाळी मनबिजचा ताबा घेतल्याची घोषणा केली. या घोषणेबरोबर मनबिजमधील सिरियन लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून यामध्ये ‘वायपीजी’ या कुर्द बंडखोरांबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्याची माहिती दिली. सिरियन लष्कराच्या या घोषणेनंतर पुढच्या काही मिनिटातच मनबिजच्या मुख्य शहरात अमेरिकेचे हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. अमेरिकी हेलिकॉप्टरच्या मनबिजवरील या घिरट्या म्हणजे सिरियातील अस्साद राजवटीसाठी इशारा असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.
अमेरिकी हेलिकॉप्टरच्या घिरट्यांवर चिंता व्यक्त केली जात असताना सिरियाच्या उत्तरेकडील सीमेजवळ मोठ्या संख्येने तैनात असलेल्या तुर्कीच्या लष्कराचे एक मोठे पथक सिरियात झाल्याचा दावा केला जातो. अलेप्पो प्रांतातील ‘जाराब्लूस’ शहरात तुर्कीचे सैनिक दाखल झाल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. सिरियन लष्कराने कुर्दांशी हातमिळवणी करू नये, अन्यथा तुर्कीच्या लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तुर्की देत आहे.
या पार्श्वभूमीवर, येत्या काही तासातच रशिया व तुर्कीच्या अधिकार्यांमध्ये विशेष बैठक पार पडणार आहे. अमेरिकेच्या सिरियातील सैन्यमाघारीच्या घोषणेनंतर या क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत असून सिरियन लष्कर व कुर्द पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या तुर्कीकडून यावर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली आहे. त्याचवेळी सिरियाबाबत तुर्कीशी सहकार्य करण्याचा निर्णय घेणार्या अमेरिकन हेलिकॉप्टर्सच्या मनबिजवरील घिरट्यांचेही परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकतात.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |