अफगाणिस्तानच्या प्रार्थनास्थळातील स्फोटात १००हून अधिक जणांचा बळी

बळी

काबुल – अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदूझ प्रांतात शियापंथियांच्या प्रार्थनास्थळात झालेल्या भयंकर स्फोटात शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या स्फोटातील जखमींची संख्याही दोनशेच्या पुढे असल्याचे सांगितले जाते. मात्र या स्फोटातील बळी व जखमींच्या संख्येबाबत तालिबान करीत असलेले दावे व आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था देत असलेली माहिती, यात फार मोठी तफावत आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने या हल्ल्यासाठी कुणावरही आरोप केलेला नाही. तालिबानचे पथक या स्फोटाच्या तपासासाठी रवाना झालेले आहे, असे झबिउल्ला मुजाहिद म्हणाला. मात्र तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होईल, हे दावे या स्फोटामुळे पूर्णपणे निकालात निघालेले आहेत.

ताजिकिस्तान सीमेजवळच्या कुंदूझ प्रांताची राजधानी कुंदूझ शहरात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शक्तीशाली स्फोट झाला. येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळात आत्मघाती दहशतवाद्यांने हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. तर काही माध्यमांनी हा बॉम्बस्फोट असल्याचे म्हटले आहे. या स्फोटावेळी प्रार्थनास्थळात किमान तीनशेजण होते. यापैकी शंभरजणांचा बळी गेल्याचा दावा रशियन वृत्तसंस्थेने अफगाणी सूत्रांच्या हवाल्याने केला. तर सध्या तालिबानच्या नियंत्रणात गेलेल्या अफगाणी वृत्तसंस्थांनी या स्फोटात ५० जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे.

बळी

या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला विरोध करणार्‍या ‘आयएस-खोरासन’च्या दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. या आठवड्याच्या सुरुवातीला राजधानी काबुलमधील एका प्रार्थनास्थळात आयएसच्या दहशतवाद्यांनी स्फोट घडविला होता. तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून घडविलेल्या या स्फोटात १२ जणांचा बळी गेला होता.

बळी

तर याआधी तालिबानने अफगाणिस्तानातील शियापंथियांची प्रार्थनास्थळे व इतर ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यामुळे शुक्रवारच्या स्फोटामागे तालिबानमधीलच एक गट असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांवर तालिबानचे हल्ले वाढले आहेत. हजारा समुदायावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या कारवाईची माहिती नुकतीच समोर आली होती. दरम्यान, ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या कुंदूझ प्रांतात हजारा, उझबेक, ताजिक या अल्पसंख्यांकांचे वास्तव्य आहे.

महिन्याभरापूर्वी तालिबानने कुंदूझ प्रांताचा ताबा घेतल्यानंतर येथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरू केल्याची माहिती समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी तालिबानने ताजिकिस्तानच्या सीमेजवळ आत्मघाती दहशतवाद्यांचे पथक तैनात केल्याची बातमी आली होती. या पार्श्‍वभूमीवर, शुक्रवारच्या या स्फोटाकडे अधिक संशयाने पाहिले जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info