वॉशिंग्टन – अमेरिकेला पिछाडीवर टाकून महासत्ता बनण्याचे प्रयत्न करणार्या चीनने तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असून ‘५जी’, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’, ‘रोबोटिक्स’ यासारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीच्या जोरावर सामर्थ्यशाली बनू पाहणार्या चीनचा मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र योजना आखल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत. या योजनेच्या बळावर चीनकडून चाललेल्या कारवायांचा मुकाबला करतानाच अमेरिकेची तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी कायम राखली जाईल, असा दावा सूत्रांनी केला.
‘पायाभूत क्षेत्रात नवी व महत्त्वाची गुंतवणूक करण्यासाठी संसदेबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. यात भविष्याचा वेध घेणार्या प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या उद्योगांमधील गुंतवणुकीचाही समावेश असेल. हा पर्याय नसून आवश्यकता आहे, याची जाणीव ठेवायला हवी’, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले होते. ट्रम्प यांचे हे उद्गार व्हाईट हाऊसकडून ‘५जी’, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’सारख्या क्षेत्रातील आघाडीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद असल्याचे मानले जाते.
ट्रम्प यांच्या संसदेतील भाषणानंतर व्हाईट हाऊसकडून याबाबत एक स्वतंत्र निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भविष्याचा वेध घेणार्या उद्योगांमध्ये अमेरिकेचे वर्चस्व कायम रहावे म्हणून प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या उद्योगांमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’, ‘ऍडव्हान्सड् मॅन्युफॅक्चरिंग’, ‘क्वांटम इर्न्फोमेशन सायन्स’ व ‘५जी’चा समावेश असल्याचे ‘व्हाईट हाऊस’ने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा याबाबतचा दृष्टिकोन धाडसी असून अमेरिकेची सुरक्षा व समृद्धीसाठी तो आवश्यक असल्याचा दावाही यात करण्यात आला.
व्हाईट हाऊसकडून आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लवकरच स्वतंत्र योजना जाहीर करेल, असे संकेत देण्यात येत आहेत. त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून काढण्यात येणार्या अध्यादेशाचाही समावेश असू शकतो, असे सांगण्यात येते. या अध्यादेशात ‘५जी’ व ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील सुधारणांसाठी निधी व इतर स्रोत उपलब्ध करून देण्याच्या निर्देशांचा समावेश असणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाबाबतचे संशोधन, विकास व इतर कार्यक्रमांना वेग मिळावा यासाठी व्हाईट हाऊसच्या देखरेखीखाली स्वतंत्र कार्यगट स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ या मुद्यावर अमेरिकेतील उद्योजकांची विशेष बैठकही आयोजित केली होती. त्यापूर्वी व्हाईट हाऊसकडून ‘सिलेक्ट कमिटी ऑन आर्टिफिशल इंटेलिजन्स’चीही स्थापना करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात अमेरिकेतील आघाडीचा अभ्यासगट असणार्या ‘सेंटर फॉर डेटा इनोव्हेशन’ने अमेरिकेला ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये स्वतंत्र धोरणाची आवश्यकता असल्याचा अहवाल दिला होता.
अमेरिकेच्या संसदेने डिसेंबरमध्येच ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’ क्षेत्रासाठी ‘नॅशनल क्वांटम इनिशिएटिव्ह ऍक्ट’ला मंजुरी दिली आहे. ‘५जी’ क्षेत्रात अमेरिकेने चिनी कंपन्यांवर बंदी घालून अमेरिकी कंपन्यांना स्वतंत्र ‘नेटवर्क’ उभारण्याचे निर्देशही दिले आहेत. जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी म्हणून ओळखण्यात येणार्या ‘मायक्रोसॉफ्ट’ने गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाला ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’सह इतर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे संकेतही दिले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |