वॉशिंग्टन – ब्रिटन, जर्मनी आणि इटलीसह इतर देशांमध्येही युरोपिय महासंघाला विरोध करणारे गट प्रबळ बनले आहेत. अशा परिस्थितीत युरोपिय महासंघाचे समर्थक मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसते. त्यांची निद्रा लवकरच भंग पावली नाही, तर १९९१ साली जसे सोव्हिएत रशियाचे तुकडे पडले होते, तसेच युरोपिय महासंघाचेही झाल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी दिला आहे.
युरोपिय महासंघाचे खंदे समर्थक आणि आशिया आणि आफ्रिकेतून युरोपमध्ये दाखल होणार्या निर्वासितांचे पाठिराखे अशी जॉर्ज सोरोस यांची ओळख आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे युरोपिय महासंघाच्या सदस्यदेशांमधील निर्वासितांना विरोध करणारे नेते व गट सोरोस यांना आपले व आपल्या देशाचे शत्रू मानतात. हंगेरीच्या सरकारने आपल्या संसदेमध्ये निर्वासितांच्या विरोधातील विधेयक संमत करून घेऊन या विधेयकाचे नामकरण ‘अँटी सोरोस बिल’ असे केले होते. तर दुसर्या बाजूला जॉर्ज सोरोस युरोपिय देशांमधील प्रखर राष्ट्रवादी आणि निर्वासितविरोधी गटांच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त करीत आहेत.
मे महिन्यामध्ये युरोपिय महासंघाची सर्वात मोठी निवडणूक पार पडणार आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, हंगेरी, पोलंड तसेच इतर युरोपिय देशांमधील उजव्या गटाचा वाढलेला प्रभाव या निवडणुकीवर प्रभाव टाकील, असा दावा केला जातो. सोरोस तसेच युरोपिय महासंघाच्या नेत्यांनी देखील मे महिन्यातील निवडणुकीमध्ये महासंघ-विरोधी गट बाजी मारतील, अशी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’ संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात सोरोस यांनी पुन्हा एकदा युरोपिय महासंघाच्या समर्थकांना एकजूट होण्याचे आवाहन केले.
हे आवाहन करीत असताना सोरोस यांनी युरोपिय महासंघाच्या नेतृत्वावरही टीका केली. ‘युरोपिय महासंघाचे सध्याचे नेतृत्व, सोव्हिएत रशिया कोसळला, त्यावेळच्या नेतृत्वाची आठवण करून देत आहे. युरोप सध्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे, हे युरोपिय महासंघाचे नेते आणि जनता, यापैकी कुणीही समजून घेण्याच्याही स्थितीत नाही. युरोपमध्ये येऊ घातलेल्या या क्रांतीमुळे अनेक शक्यता निर्माण होतील. त्यामुळे ही क्रांती वेळीच रोखली नाही तर युरोपमध्ये अस्थैर्य निर्माण होईल’, असा इशारा सोरोस यांनी दिला.
युरोपिय देशांमधील मतदानाची पद्धत अजूनही कालबाह्य प्रकारे सुरू असल्यामुळे महासंघाला विरोध करणारे गट अधिक मजबूत बनतील, असे सोरोस म्हणाले. युरोपमध्ये सध्या जनाधार असलेल्या गटांचे प्राबल्य वाढत असून या गटांचा युरोपिय महासंघाच्या स्थापनेलाच विरोध आहे. हंगेरीमधील विक्टर ऑर्बन आणि इटलीतील साल्विनी यांच्या सरकारने उघडपणे महासंघ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. जर्मनी-फ्रान्सकडून नियंत्रित केल्या जाणार्या महासंघाचे निर्वासितांबाबतचे धोरण युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.
निर्वासितांबाबत महासंघाने स्वीकारलेल्या निर्णयाचे सोरोस यांनी समर्थन केले होते. मात्र निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये घुसवून सोरोस यांच्यासारखे धनाढ्य गुंतवणूकदार युरोपात आपल्या स्वार्थासाठी युरोपच्या समाजरचनेतच बदल घडवित आहेत,
असा आरोप करण्यात येत आहे. सोरोस संपूर्ण युरोपची वाताहत घडवून त्यातून प्रचंड नफा उकळण्याची कारस्थाने आखत असल्याचा आरोप हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |