‘बलोच आर्मी’चे पाकिस्तानी लष्करावर हल्ले – आझाद बलोचिस्तान झिंदाबाद!

‘बलोच आर्मी’चे पाकिस्तानी लष्करावर हल्ले – आझाद बलोचिस्तान झिंदाबाद!

लंडन/क्वेट्टा  – पाकिस्तानी लष्कर आणि कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या दडपशाहीविरोधात बलोचिस्तानमधील नागरिकांनी पुकारलेला संघर्ष तीव्र झाला आहे. ‘बलोच रिपब्लिक आर्मी’ (बीआरए) या बंडखोर संघटनेने पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढवून तीन सुरक्षा चौक्या उडवून दिल्या. या संघटनेने सदर हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून ‘आझाद बलोचिस्तान झिंदाबाद’चा जयघोष केला. बलोचिस्तानमधील बंडखोर संघटनांकडून हल्ल्याची शक्यता वाढल्यामुळे पाकिस्तानी लष्कराने ‘आयएसआय’च्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांना सुरक्षित स्थळी लपविल्याची माहिती समोर येत आहे. तर स्वतंत्र बलोचिस्तानचा नारा जगभरात बुलंद करण्यासाठी लवकरच युरोप, अमेरिका आणि कॅनडामध्ये बलोच समर्थक मोठ्या प्रमाणात रॅली काढणार आहेत.

‘बीआरए’च्या अधिकृत चॅनलकडून पाकिस्तानी लष्करावरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये बलोचिस्तानच्या रस्त्यांवर पाकिस्तान सरकार, लष्कर आणि ‘आयएसआय’विरोधात काढलेल्या निदर्शनांचा काही भाग दाखविण्यात आला आहे. तर पुढच्या काही सेकंदामध्ये बलोचिस्तानच्या ‘केच’ प्रांतातील ‘मंड’ भागात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षा चौक्यांवर रॉकेट हल्ले चढविल्याचे दिसत आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या तीन सुरक्षा चौक्या उद्ध्वस्त झाल्याचा दावा ‘बीआरए’च्या कमांडरने केला. तसेच या चौक्या उद्ध्वस्त झाल्यानंतर बलोच कमांडरने  त्वरित स्वतंत्र बलोचिस्तानचा विजय झाल्याच्या घोषणा दिल्या. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘बीआरए’च्या बंडखोरांनी हा हल्ला चढविल्याचे बोलले जाते.

खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या बलोचिस्तानची पाकिस्तान सरकार व लष्कराकडून सुरू असलेल्या पिळवणूकीचा लवकरच स्फोट होईल, असा दावा केला जात होता. आघाडीच्या विश्‍लेषकांनी तसा इशाराही प्रसिद्ध केला होता. गेल्या आठवड्यात भारतीय संरक्षणदलांनी पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी केंद्रांवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे बलोचिस्तानमध्ये खदखदत असलेल्या  असंतषाच्या उद्रेकाची घटका निकट आल्याचे विश्‍लेषकांनी बजावले होते. बालाकोट येथील भारताच्या हवाई हल्ल्यामुळे भयग्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील तैनाती वाढविली आहे.

यासाठी पाकिस्तानी लष्कराने बलोचिस्तानमध्ये तैनात असलेल्या आपल्या सैनिकांना देखील भारताच्या सीमेजवळ तैनात केले आहे. याचा फायदा घेऊन स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणार्‍या बंडखोर संघटना पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढवतील, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘स्वतंत्र बलोचिस्तान’ची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक तीव्र करण्यासाठी जगभरातील बलोच जनतेने येत्या महिनाअखेरीस मोठ्या निदर्शनांचे आयोजन केले आहे. ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’ (एफबीएम) या संघटनेने ब्रिटनची राजधानी लंडनसह युरोपमधील प्रमुख शहरे तसेच अमेरिका व कॅनडामध्ये पाकिस्तान सरकार व लष्कराकडून बलोच जनतेवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात निदर्शनांची घोषणा केली. गेल्या कित्येक दशकांपासून बलोच संघटना पाकिस्तानी लष्कराच्या जुलूमाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागत आहेत. मात्र सध्या आर्थिक व राजकीय प्रभाव गमावून बसलेल्या व अशा स्थितीत भारतासारख्या देशाशी वैर पत्करणार्‍या पाकिस्तानला निर्णायक धक्का देण्याची हीच वेळ असल्याचे बलोच बंडखोरांचे म्हणणे आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info