राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ब्रिटनच्या दौर्‍यावर असताना अमेरिकेचा नाटोतून बाहेर पडण्याचा युरोपला इशारा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ब्रिटनच्या दौर्‍यावर असताना अमेरिकेचा नाटोतून बाहेर पडण्याचा युरोपला इशारा

ब्रुसेल्स – ‘युरोपिय देशांचे स्वतंत्र लष्कर उभारण्यासाठी सुरू असलेल्या जर्मनी व फ्रान्सच्या हालचालींविरोधात अमेरिकेने कडक इशारा दिला. युरोपिय देशांनी स्वतंत्र लष्कराची आपली योजना निकालात काढावी, अन्यथा अमेरिका नाटोतूनच बाहेर पडेल’, असे अमेरिकेने धमकावले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटॅगॉन’ने युरोपिय महासंघाला दिलेल्या या इशार्‍याबाबत स्पेनच्या वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ब्रिटनच्या दौर्‍यावर असताना ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

लंडनस्थित ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज्’ (आयआयएसएस) या अभ्यासगटाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नाटोकडे पाठ फिरवून युरोपिय देश स्वतंत्र संरक्षणदल उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्याच्या तयारीत आहेत. नौदलासाठी ११० अब्ज डॉलर्स तर लष्करासाठी ३५७ अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना जर्मनी व फ्रान्सने मांडल्याचे या अभ्यासगटाचे म्हणणे आहे. पण युरोपिय देशांनी नाटोमध्ये राहून या लष्करी संघटनेचा खर्चाचा भार उचलावा, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे.

याआधी नाटोच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाटोचा भार वाहण्यास नकार देणार्‍या युरोपिय देशांना फटकारले होते. युरोपिय देश आपली जबाबदारी उचलणार नसतील तर अमेरिका या लष्करी संघटनेतून माघार घेईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. रविवारी रात्री ‘अल पायस’ या स्पॅनिश वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीतही याच मुद्यावरुन अमेरिकेने युरोपिय महासंघाला फटकारल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील युरोपिय देशांसाठी नियुक्त केलेले सहसचिव ‘मायकल मर्फी’ यांनी युरोपिय महासंघाला निर्वाणीचा इशारा दिला.

‘युरोपिय महासंघ आपल्या निर्णयात बदल करणार नसेल आणि अमेरिकेतील डिफेन्स कॉंट्रक्टर्सशी व्यवहार करण्यासाठी तयार नसतील, तर अमेरिका नाटोतून माघार घेईल. अमेरिकेची नाटोतून माघार म्हणजे युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या करारातून अमेरिकेची माघार ठरते. असे झाले तर रशियाच्या हल्ल्यांपासून युरोपिय देशांची सुरक्षा करण्यास अमेरिका बांधील नसेल’, असे मर्फी यांनी बजावले.

गेल्या महिन्यात मर्फी यांनी युरोपिय महासंघाच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत हा इशारा दिला होता. तर त्याआधी पेंटॅगॉनने युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख फ्रेडरिका मोघेरिनी यांनाही यावरुन इशारा देण्यात आला होता. दरम्यान, युरोपियन महासंघाच्या संयुक्त लष्कराची उभारणी करण्याची तयारी जर्मनी व फ्रान्स करीत आहेत. पण युरोपमधील सर्वच देश या निर्णयाशी सहमत नाहीत. ‘नाटो’चे माजी प्रमुख अँड्रेस रासमुसेन यांनी युरोपियन देशांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. युरोपियन लष्कर नामक कागदी वाघाच्या नाही, तर सामर्थ्यशाली नाटोच्या मागे ठामपणे उभे रहा, असे रासमुसेन म्हणाले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info