तेहरान, दि. १९ (वृत्तसंस्था) – इराणच्या सरकारविरोधात सुरू असलेली निदर्शने दडपण्यात इराणची सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्यास, रोहानी सरकारने सिरियामध्ये संघर्ष करीत असलेल्या गटांना हाताशी घ्यावे, अशी सूचना इराणच्या ‘तेहरान इस्लामिक रिव्होल्युशनरी कोर्ट’चे प्रमुख ‘मुसा घझनफराबदी’ यांनी केली. त्यांच्या या विधानांवर इराणच्या जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून काही पत्रकारांनी रोहानी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेऊन इराणवर कठोर निर्बंध लादले होते. आतापर्यंत अमेरिकेने तीन टप्प्यात इराणवरील निर्बंधांचा फास आवळला असून याचा थेट परिणाम इराणची अर्थव्यवस्था तसेच इंधनाच्या निर्यातीवर होत आहे. यामुळे इराणची अर्थव्यवस्था खालावली असून राष्ट्राध्यक्ष रोहानी यांचे आर्थिक धोरण फसल्याची टीका इराणी जनता, व्यापारी व कामगारवर्ग करीत आहे.
गेल्या आठ महिन्यात इराणमधील १६ हून अधिक शहरांमध्ये रोहानी सरकारविरोधात निदर्शने काढण्यात आली आहेत. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या इराणी जनता आणि व्यापारी तसेच कामगारवर्गाने रोहानी यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. तर काही शहरांमधील निदर्शनात इराणमध्ये कट्टरपंथी विचारधारा लागू करणारी सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्ला खामेनी यांची राजवट उलथण्याची मागणीही करण्यात आली होती.
या निदर्शकांना पांगविण्यासाठी इराणच्या सरकारने पोलीसदलाबरोबरच रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जवानांचेही सहकार्य घेतले होते. पण इराणच्या लष्करालाही निदर्शने थोपविण्यात पूर्ण यश मिळालेले नाही. आजही इराणच्या काही शहरांमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर, धार्मिक नेते घझनफराबदी यांनी कोम शहरात केलेल्या भाषणात परदेशातील इराणच्या ‘रिझर्व्ह फोर्स’चा वापर करण्याचे सुचविले.
इराणच्या सुरक्षा यंत्रणांना या निदर्शकांचे आव्हान पेलणार नसेल किंवा निदर्शकांवरील कारवाईत यंत्रणा अपयशी ठरल्या तर रोहानी सरकारने परदेशातील आपल्या प्रभावाखाली असलेल्या जहाल गटांना हाताशी घ्यावे, असे घझनफराबदी यांनी म्हटले आहे. सध्या सिरियामध्ये सुरू असलेल्या संघर्षात इराणच्या नेतृत्वाखाली इराकमधील ‘हश्द अल-शाबी’, अफगाणी ‘फत्तेमिया ब्रिगेड’, पाकिस्तानातील ‘झैनेबियोन’ तर येमेनमध्ये ‘हौथी’ बंडखोर संघर्ष करीत आहेत. हे इराण संलग्न गट म्हणजे इराणची परदेशातील ‘रिझर्व्ह फोर्स’ असल्याचा दावा इराणचे नेते व अधिकारी करीत आहेत. इराणमधील राजवट वाचवायची असेल तर या गटांचा वापर करावा, असे मुसा घझनफराबदी यांनी स्पष्ट केले.
‘सिरिया आणि इतर देशांमधील संघर्षात वापरल्या जाणार्या परदेशी सैनिकांचा वापर एकेदिवशी इराणच्या जनतेविरोधातच केला जाईल. इराणच्या जुलमी राजवटीला वाचविण्यासाठी या परदेशी गटांचा वापर केला जाईल, हे इराणच्या प्रादेशिक धोरणांचे आणि इराण संलग्न कट्टरपंथियांचे समर्थन करणार्यांनाही वाटले नसेल’, अशी जोरदार टीका ‘रेझा हाघिघात नेजाद’ या इराणच्या प्रसिद्ध पत्रकाराने केली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |