भारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे १२ जवान ठार – पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त

भारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे १२ जवान ठार – पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारताच्या जवानांचे बळी घेणार्‍या पाकिस्तानची भारतीय लष्कराने चांगलीच खोड मोडली. गुरुवारी नियंत्रण रेषेवरील सुंदरबनी सेक्टरजवळील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उडवून देऊन तब्बल १२ पाकिस्तानी जवानांना भारतीय लष्कराने ठार केले. यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या दोन अधिकार्‍यांचाही समावेश असून पाकिस्तानचे २२ जवान जखमी असल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुंदरबनी सेक्टरमध्ये दोन्ही देशांच्या लष्कराची घुमश्‍चक्री सुरू असून गुरुवारी या गोळीबारात भारताचा जवान शहीद झाला होता.

‘बालाकोट’ येथे भारताच्या वायुसेनेने हल्ला चढवून दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतरच्या काळात पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार व मॉर्टर्सचा जोरदार हल्ला सुरू केला होता. तसेच पाकिस्तानी लष्कराकडून या ठिकाणी लांब पल्ल्याच्या तोफांचाही मारा सुरू ठेवला. यामुळे भारताच्या नागरी वस्तीचे नुकसान होत असून भारतीय लष्कर कधीही अशा स्वरुपाची कारवाई करीत नाही, असे लष्कराने पाकिस्तानला बजावले होते. यानंतर काही तास पाकिस्तानचा गोळीबार थांबला होता. पण त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. नियंत्रण रेषेवरील राजौरी, सुंदरबनी सेक्टरमधील पाकिस्तानच्या गोळीबाराची व मॉर्टर्सच्या हल्ल्याची तीव्रता वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर आले होते.

भारतीय लष्कराकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत असून पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी लष्कराने बोफोर्स तोफा तैनात केल्याचे वृत्त आहे. याबरोबरच लष्कराने स्नायपर रायफलींचा वापर सुरू करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र गुरुवारी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात भारताचे जवान यश पॉल शहीद झाले. यानंतर लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर जबरदस्त मारा सुरू केला. यात पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून त्यांचे १२ जवान ठार झाले आहेत. यामध्ये दोन अधिकार्‍यांचा समावेश असून जखमींची संख्या २२ वर गेल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच आपल्या जवानांचे मृतदेह नेण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हेलिकॉप्टर्सचा वापर केल्याचीही बातमी समोर आली आहे.

शुक्रवारीही नियंत्रण रेषेवरील पुंछ सेक्टरमध्ये दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चकमक उडाली. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार व मॉर्टर्स तसेच तोफांचा भडीमार करून आपल्या हानीचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराकडून त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळाले. नियंत्रण रेषेवर सध्या युद्धच सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून यामुळे कित्येक गावातील जनतेला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबिर सिंग यांनी राजौरी सेक्टरला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या चौक्यांची पाहणी करून जवानांशी थेट संवाद साधला व युद्धसज्जतेचा आढावाही घेतला.

शनिवारी पाकिस्तानात ‘नॅशनल डे’ साजरा केला जाणार आहे. यासाठी भारतालाही आमंत्रण देण्यात आले होते. पण जम्मू-काश्मीरमधील फुटिरांना आमंत्रण देऊन पाकिस्तानने चिथावणी दिल्याचा ठपका ठेवून भारताने पाकिस्तानचे हे आमंत्रण नाकारले आहे. त्याचवेळी जे फुटीर नेते पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारून या देशाला भेट देतील, त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेतही भारताकडून दिले जात आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले असून पुढच्या काळात हा तणाव कमी होण्याची शक्यता दृष्टीपथात नाही.

त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबरोबरील हा तणाव कमी होण्याच्या ऐवजी वाढत राहणार असून भारतात होणार्‍या निवडणुकीशी या तणावाचा संबंध जोडला आहे. भारतात निवडणूक संपन्न होत नाही, तोवर पाकिस्तानने युद्धसज्जता कायम ठेवावी, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मात्र भारताने पाकिस्तानबाबत स्वीकारलेल्या या आक्रमक धोरणाचा भारतातील निवडणुकीशी संबंध नाही, असे काही पाकिस्तानी विश्‍लेषकांनीच आपल्या सरकारला बजावले आहे. पाकिस्तानच्या सरकारने ही बाब अधिक गांभीर्याने घ्यावी, अशी या विश्‍लेषकांची मागणी आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info