जेरूसलेम – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझापट्टीतील ‘हमास’ तसेच ‘इस्लामिक जिहाद’च्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवून ‘तेल अविव’वर झालेल्या रॉकेट हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्यानंतर गाझातून इस्रायलच्या नऊ शहरांवर किमान ३० रॉकेट हल्ले चढविले असून ‘आयर्न डोम’ ही इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणाही या हल्ल्यात नष्ट झाली आहे. यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा गाझात हल्ले करून हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याचे कार्यालय आणि हमासच्या गुप्तचर यंत्रणेची इमारत हल्ल्यात उद्ध्वस्त केली. बराच काळ सुरू असलेल्या इस्रायली लष्कर आणि हमासमधील या संघर्षामुळे गाझापट्टीमध्ये नवे युद्ध भडकण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमांनी वर्तविली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि गाझापट्टीच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. हमास समर्थकांनी इस्रायलच्या सीमेजवळ सुरू केलेल्या हिंसक निदर्शनांना भडका उडून इस्रायल आणि हमासमध्ये मोठा संघर्ष उडण्याची भीती वर्तविण्यात येत होती. सोमवारी पहाटे गाझापट्टीतून इस्रायलची आर्थिक राजधानी?‘तेल अविव’वर रॉकेट हल्ला चढवून हमासने या संघर्षाच्या आगीला हवा घातली. हमासच्या या रॉकेट हल्ल्यात सात इस्रायली नागरिक गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन मुलांचा समावेश होता. या हल्ल्याला इस्रायल जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून निघणार्या पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला होता.
इस्रायली लष्कराने सोमवारी संध्याकाळपासून गाझापट्टीतील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरील हल्ले सुरू केले. यामध्ये गाझातील हमास तसेच इस्लामिक जिहाद या दोन्ही दहशतवादी संघटनांचे तळ, प्रशिक्षण केंद्र, शस्त्रकोठार तसेच इतर ठिकाणे नष्ट केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. इस्रायलच्या या कारवाईत हमासचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे पेटलेल्या हमासने सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले सुरू केले. इस्रायच्या उत्तरेकडील ‘स्देरॉत’ शहरापासून ते ७५ मैल अंतरावर असलेल्या शहरांनाही हमासच्या रॉकेट्सनी लक्ष्य केले.
यापैकी एका रॉकेटने इस्रायलची ‘आयर्न डोम’ ही हवाईसुरक्षा यंत्रणा भेदल्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी मध्यरात्रीपासून गाझावर पुन्हा हल्ले तीव्र केले असून १५ ठिकाणे जमीनदोस्त केली. तसेच हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी निसटू नये म्हणून इस्रायलने ‘एरेझ’ आणि ‘केरेम शालोम’ सीमारेषा बंद केली आहे. यामुळे इजिप्त सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता वर्तवून इस्रायलने लष्कराच्या दोन ब्रिगेड दक्षिण सीमारेषेसाठी रवाना केल्या आहेत. त्याचबरोबर राखीव सैनिकांनाही सेवेवर बोलविण्याची तयारी इस्रायली लष्कराने केली आहे. त्यामुळे इस्रायल गाझापट्टीत सैन्य घुसवून हमासविरोधात युद्धाची घोषणा करू शकतो, असा दावा अमेरिकेतील विश्लेषक व माध्यमे करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |