चीनने धर्मश्रद्धेविरोधात युद्ध पुकारले आहे अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने धर्मश्रद्धेच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. पण हे युद्ध ते कधीही जिंकू शकणार नाहीत’, असे सांगून अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी खळबळ माजविली आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा आपल्याच जनतेवर विश्‍वास नाही, म्हणूनच ही राजवट जनतेला आपल्या धर्मश्रद्धेनुसार आचरण करू देत नाही, असा जबरदस्त टोलाही या अधिकाराने लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये इस्लामधर्मिय अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असून यामध्ये उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अन्यायाला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतीच वाचा फोडली होती.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘इंटरनॅशनल रिलिजस फ्रिडम’ विभागाचे विशेषदूत ‘सॅम ब्राऊनबॅक’ यांनी चीनच्या राजवटीवर सडकून टीका केली. चीनची ही कम्युनिस्ट राजवट धर्मश्रद्धेच्याच विरोधात गेली असून या राजवटीने धर्मश्रद्धेशी युद्धच पुकारल्याचे दिसत आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या घडामोडी हेच सिद्ध करीत आहेत, असा दावा ब्राऊनबॅक यांनी केला. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा आपल्याच जनतेवर विश्‍वास राहिलेला नाही. म्हणूनच जनतेला धार्मिक स्वातंत्र्य देऊन आपल्या धर्मश्रद्धेचे अनुसरण करण्याची मुभा ही राजवट देत नाही. चीनच्या या अन्यायामुळे अब्जावधी जनतेची धर्मश्रद्धा पणाला लागल्याचे दिसत आहे, अशी खंत ब्राऊनबॅक यांनी व्यक्त केली. मात्र काहीही झाले तरी चीन धर्मश्रद्धेविरोधातील या युद्धात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावा ब्राऊनबॅक यांनी केला.

उघूरवंशिय इस्लामधर्मियांना चीनच्या राजवटीने कडक नियमात जखडले असून उघूरवंशिय आपल्या मुलांची नावे आपल्या धर्मानुसार ठेवू शकणार नाहीत, अशी तरतूद चीनने केली आहे. इतकेच नाही तर चीनच्या राजवटीकडून धर्माने निषिद्ध ठरविलेले अन्न उघूरवंशियांना जबरदस्तीने दिले जात आहे, अशी धक्कादायक माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी उघड केली होती. हा भयावह प्रकार असून हे मानवी अधिकारांचे घृणास्पद पातळीवरील उल्लंघन ठरते, अशी टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी तसेच मानवाधिकार संघटनांनी केली होती. तसेच तिबेटमधील बौद्धधर्मियांनाही चीनच्या धर्मविरोधी धोरणाचा फटका बसत आहे.

चीनच्या नियमानुसार तिबेटमधील बौद्धधर्मिय जनता आपले धार्मिक नेते निवडू शकत नाही. चीनचा हा हस्तक्षेप तिबेटमधील बौद्धधर्मियांच्या तीव्र संतापाचा विषय ठरत आहे. याबरोबरच चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या देशातील ख्रिस्तधर्मियांची प्रार्थनास्थळे नष्ट केल्याची उदाहरणे आहेत. तर काही प्रार्थनास्थळांमध्ये सर्व्हिलन्स कॅमेरा बसविण्याची सक्ती करून चीनच्या राजवटीने ख्रिस्तधर्मियांनाही दुखावले आहे.

अशारितीने चीन आपल्या देशातील केवळ धार्मिक अल्पसंख्यांकांचाच नाही, तर समस्त जनतेच्या धर्मश्रद्धेला आव्हान देत आहे. ब्राऊनबॅक यांनी ही बाब अधोरेखित करून चीनने आपले धोरण बदलावे, असे बजावले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची चीनबाहेर असलेल्या काही उघूरवंशिय नेत्यांनी भेट घेतली व आपली कैफियत मांडली होती. त्यानंतर पॉम्पिओ यांनी एकीकडे मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याला पाठिशी घालणारा चीन आपल्या देशातील इस्लामधर्मिय जनतेवर अन्याय करीत आहे, अशी जहाल टीका केली होती.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info