लिबियातील संघर्षामुळे हजारो विस्थापित – राजधानी त्रिपोलीजवळ लिबियन लष्कर व बंडखोरांमध्ये हवाई संघर्ष सुरू

लिबियातील संघर्षामुळे हजारो विस्थापित – राजधानी त्रिपोलीजवळ लिबियन लष्कर व बंडखोरांमध्ये हवाई संघर्ष सुरू

त्रिपोली – लिबियातील सरकारशी एकनिष्ठ असलेले लष्कर आणि बंडखोर लष्करी अधिकारी जनरल हफ्तार समर्थक ‘एलएनए’च्या बंडखोरांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. हफ्तार समर्थक ‘एलएनए’चे बंडखोर राजधानी त्रिपोलीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर पोहोचले असून त्यांनी लिबियन राजधानीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. लिबियन लष्कराकडून बंडखोरांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात असले तरी या संघर्षाच्या कचाट्यात सापडलेल्या लिबियन जनतेने जीवाच्या भीतीने शहरातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४५०० नागरिक विस्थापित झाले असून येत्या काळात संघर्ष सुरू राहिला तर निर्वासितांची संख्या वाढण्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.

बंडखोर लष्करी अधिकारी जनरल ‘खलिफा हफ्तार’च्या नेतृत्वाखाली ‘लिबियन नॅशनल आर्मी’ने (एलएनए) त्रिपोलीजवळ धडक दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात २१ जणांचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एलएनए’च्या लढाऊ विमानांनी त्रिपोलीमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ले चढवून ताबा घेतला होता. या हवाई हल्ल्यांमध्ये विमानतळाची धावपट्टी तसेच जवळच्या भागाचे नुकसान झाले होते. हल्ल्यावेळी प्रवासी विमान धावपट्टीवर नव्हते, यामुळे जीवितहानी टळली. पंतप्रधान सेराज यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या लष्कराने ‘एलएनए’च्या बंडखोरांवर हल्ला चढवून अवघ्या काही तासात या विमानतळाचा ताबा घेतला. पण या हल्ल्यामुळे विमानतळाची सेवा खंडीत झाली असून जनतेमध्ये घबराहट पसरली आहे.

या भीतीमुळे लिबियन जनतेने त्रिपोलीतून पळ काढण्यास सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसात ४५०० नागरिकांनी त्रिपोली सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. पण त्रिपोलीतील लोकसंख्या १२ लाखच्या आसपास असून लिबियन सरकार आणि ‘एलएनए’च्या बंडखोरांमधील संघर्षामुळे येथील लाखो जणांची सुरक्षा धोक्यात सापडल्याची चिंता राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. त्रिपोलीच्या जवळच्या भागात सिरियन लष्कर आणि बंडखोरांमध्ये हवाईसंघर्ष सुरू असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. या संघर्षावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर त्रिपोलीतील लाखो जण विस्थापित होतील आणि मोठे संकट निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रसंघाने दिला आहे.

या संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने ‘एलएनए’प्रमुख बंडखोर जनरल हफ्तार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. प्रवासी विमानतळावर हल्ला चढवून हफ्तार यांच्या बंडखोरांनी ‘युद्ध गुन्हा’ केल्याचा ठपका राष्ट्रसंघाने ठेवला. लिबियन बंडखोरांचे हे हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत, असे सांगून जनरल हफ्तार यांनी संघर्ष थांबवावा, असे आवाहनही राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी केले. फ्रान्सने देखील लिबियातील संघर्षात सेराज सरकारला पाठिंबा असल्याचे घोषित केले आहे.

दरम्यान, राष्ट्रसंघाने आवाहन केले असले तरी जनरल हफ्तारने हे आदेश धुडकाले आहेत. येत्या काही तासात त्रिपोली जवळच्या इंधनाचे प्रकल्प ताब्यात घेण्याची धमकी जनरल हफ्तारने दिली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info