श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरली – २१५ जणांचा बळी • ५०० जखमी

श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरली – २१५ जणांचा बळी • ५०० जखमी

कोलंबो – श्रीलंकेतील चर्च आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या हॉटेल्समध्ये आठ भीषण बॉम्बस्फोट झाले असून यात २१५ जणांचा बळी गेला आहे. यातील जखमींची संख्या ५०० वर गेली असून या भयंकर हल्ल्याची जगभरातून कठोर शब्दात निर्भत्सना होत आहे. बळींमध्ये तीन भारतीय असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. अद्याप या भयंकर हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र दहा दिवसांपूर्वी श्रीलंकेतील चर्च, हॉटेल्स आणि भारतीय दूतावासाला आत्मघाती हल्ल्याचा धोका असल्याची माहिती परदेशी गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेला दिली होती.

बॉम्बस्फोट, हल्ला, सेंट अँटनी चर्च, संचारबंदी, सहाय्याचे आश्‍वासन, ww3, श्रीलंका, भारतरविवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील ‘सेंट अँटनी चर्च’, निगोंबा येथील ‘सेंट सॅबेस्टियन चर्च’ व बॅटीकोला येथील झिऑन चर्च इथे ‘इस्टर मास’ सुरू असताना भीषण बॉम्बस्फोट झाले. या दरम्यान कोलंबोमधील ‘शांग्री-ला’, ‘द सिनेमॉन ग्रँड’, ‘द किंग्ज्बेरी’, ‘ट्रॉपिकल इन’ या पंचतारांकित हॉटेल्स तसेच आणखी एका ठिकाणी भयंकर हादरा देणारे बॉम्बस्फोट घडविण्यात आले. या आठ स्फोटांमध्ये सुमारे २१५ जणांचा बळी गेला असून ५०० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार या बॉम्बस्फोटांमध्ये ३५ विदेशींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

बॉम्बस्फोटांच्या भयंकर मालिकेनंतर श्रीलंकेत भयंकर गदारोळ माजला. तातडीने संचारबंदी लागू करून सुरक्षा यंत्रणांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केला. तसेच श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीनंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी जनतेला शांतता व एकजुटीचे आवाहन केले. तसेच अफवांवर विश्‍वास ठेवून वातावरण अधिक अस्थिर करू नका, असा संदेश पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी दिला. तर राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी जनतेला शांतता व एकजुटीचे आवाहन केले.

जगभरातील सर्वच प्रमुख देशांनी निषेध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटांवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून या कठीण परिस्थितीत भारत श्रीलंकन जनतेच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे. त्याचवेळी अशा अमानवी प्रवृत्तींना आपल्या क्षेत्रात थारा देता येणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केली असून या प्रकरणी सर्वतोपरी सहाय्याचे आश्‍वासन दिले आहे.

या भीषण हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी श्रीलंकेत तमिळ अतिरेकी संघटना ‘लिट्टे’ने असे भीषण घातपात घडविले होते. पण रविवारच्या या भयंकर स्फोटांच्या मालिकेसाठी ‘नॅशनल तौहीत जमात’ (एनटीजे) नावाच्या कट्टरपंथीय संघटनेचे नाव पुढे येत आहे. विदेशी गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेला भीषण हल्ल्याचा धोका असल्याचे बजावले होते.

श्रीलंकेतील प्रमुख चर्च व राजधानी कोलंबो येथील भारतीय दूतावास हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याची माहिती या गुप्तचर संस्थांनी दिली होती. गेल्या वर्षी ‘एनटीजे’ने काही मुर्तींची तोडफोड केल्याच्या प्रक्षोभक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे सदर हल्ल्या प्रकरणी ‘एनटीजे’कडे संशयाने पाहिले जात आहे. या स्फोटांमध्ये काही ठिकाणी आत्मघाती हल्ले झाल्याचे वृत्त असून काहीजणांनी या आत्मघाती हल्लेखोरांना पाहिल्याचेही दावे केले आहेत. या प्रकरणी तपास सुरू झाला असून आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेतील घडामोडीवर भारत नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकेतील दूतावासाशी आपण संपर्क ठेवून असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी दिली असून भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आल्याचे स्वराज यांनी सांगितले. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाला असलेला धोका लक्षात घेऊन इथली सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info