अमेरिका व रशियासोबतच्या ‘न्यू स्टार्ट’मध्ये सामील होण्यास चीनचा नकार

अमेरिका व रशियासोबतच्या ‘न्यू स्टार्ट’मध्ये सामील होण्यास चीनचा नकार

बीजिंग – ‘कुठल्या देशाने मर्यादेबाहेर जाऊन चीनच्या अण्वस्त्रांच्या संख्येवर चर्चा करू नये. अण्वस्त्रबंदी बाबतच्या कुठल्याही त्रिपक्षीय बैठकीत चीन सहभागी होणार नाही’, अशा स्पष्ट शब्दात चीनने अमेरिका व रशियाने दिलेला ‘न्यू स्टार्ट’ कराराचा प्रस्ताव धुडकावला. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात भर घालत असल्यानेच अमेरिकेने ‘स्टार्ट’ करारातून माघार घेतल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे होते. त्यामुळे या कराराला चीनने दिलेला नकार लक्षवेधी ठरतो.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा पार पडली होती. तासभराच्या या चर्चेत दोन्ही देशांमध्ये नव्या अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबतच्या ‘स्टार्ट’ (स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी) करारावर चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने रशियाबरोबरच्या ‘आयएनएफ’ (इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी) करारातून माघार घेतली होती. त्यानंतर रशियाबरोबरच्या ‘स्टार्ट’ करारातून बाहेर पडण्याचीही तयारी अमेरिकेने केल्याच्या बातम्या आल्या होत्या. वरकरणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियावर दोषारोप करून या करारांमधून माघार घेण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात चीनमुळे अमेरिका या करारातून बाहेर पडल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व पुतिन यांच्यात ‘स्टार्ट’ कराराबाबत झालेल्या चर्चेचे महत्त्व वाढले होते.

अमेरिका व रशियातील या ऐतिहासिक करारात चीनला सहभागी करून घेण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाल्याची माहिती समोर आली होती. चीनकडे किमान ३०० अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जातो. पण आपल्या संरक्षणसज्जतेबाबत चीन खरी माहिती उघड करीत नसून चीनकडे घोषित संख्येपेक्षा अधिक अण्वस्त्रे असल्याचा दाट संशय अमेरिकी अभ्यासगटांनी याआधी व्यक्त केला होता.

त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये चीनने हायपरसोनिक आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरू केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, अण्वस्त्रांच्या संख्येवर मर्यादा टाकण्यासंबंधीच्या ‘स्टार्ट’ करारात चीनलाही सहभागी करून घ्यावे, असा प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने रशियाबरोबरच्या ऐतिहासिक ‘आयएनएफ’ करारातून माघार घेतली होती.

पण अमेरिका व रशियाच्या ‘स्टार्ट’ करारात सहभागी होण्यासाठी चीन तयार नाही. ‘अमेरिका व रशियाने सर्वात आधी आपल्या अण्वस्त्रांची संख्या कमी करावी आणि मगच इतर देशांना त्याबाबत सल्ला द्यावा’, असा टोला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी लगावला. तसेच अमेरिकेचा थेट उल्लेख न करता, चीनच्या अण्वस्त्रांच्या संख्येबाबत मर्यादेबाहेर जाऊन चर्चा करू नये, असे शुआंग यांनी बजावले. या व्यतिरिक्त अण्वस्त्रांना नष्ट करण्याबाबतच्या भूमिकेचे चीन समर्थन करीत असल्याचे सांगितले. पण इतर देशांच्या तुलनेत चीनकडे कमी अण्वस्त्रे असल्याचे सांगून शुआंग यांनी आपल्या देशाच्या आण्विक धोरणाचे समर्थन केले.

दरम्यान, नव्या स्टार्ट करारात रशियाबरोबर चीनलाही सहभागी करून घेण्याची अमेरिकेची मागणी ही फार मोठी धोरणात्मक खेळी मानली जाते. नव्या ‘स्टार्ट’ करारात चीनला सहभागी करून घेणे अमेरिकेप्रमाणे रशियाही अनुकूल असल्याचे बोलले जात होते. पण चीनने या करारात सहभागी न होण्याचे जाहीर करून याबाबत आपण सहकार्यासाठी तयार नसल्याचे बजावले आहे. या धोरणामुळे चीन बेजबाबदार आण्विक शक्ती असल्याचा आरोप अमेरिकेकडून केला जाऊ शकतो. त्याचा आधार घेऊन अमेरिका आपल्या नव्या आक्रमक अण्वस्त्रविषयक धोरणाचे जोरदार समर्थन करू शकते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info