तेहरान – अणुकरार मोडीत काढून युरेनियमचे संवर्धन सुमारे चार पटींनी वाढविण्याची तयारी इराणने केली आहे. इराणच्या अणुइंधन विभागाचे प्रवक्ते ‘बेहरौझ कमलावंदी’ यांनी याबाबतची माहिती उघड केली. त्यांच्याकडून ही माहिती समोर येत उघड केली जात असताना, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत तडजोड केली जाणार नाही, असा संदेश दिला आहे. रशिया व युरोपिय देश इराणने अणुकराराचे पालन करावे, अशी मागणी करीत आहेत. त्यांची ही मागणी इराणने धुडकावल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. २०१५ साली अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व चीन या देशांबरोबर इराणने अणुकरार केला होता. या अणुकराराचे पालन करून युरेनियमचे संंवर्धन नियंत्रणात ठेवण्याचे इराणने मान्य केले होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ साली इराणबरोबरील या अणुकरारातून माघार घेतली होती. तरीही इराणने या अणुकराराचे पालन करावे, अशी मागणी युरोपिय देश तसेच रशियाकडून केली जात आहे. मात्र या अणुकराराचे संरक्षण करण्यासाठी युरोपिय देश प्रयत्न करीत नसल्याचा ठपका इराणने ठेवला होता.
यामुळे इराणवर अणुकराराचे पालन करण्याच बंधन उरलेले नाही, असे सांगून इराणने हा करार मोडण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी अमेरिकेकडून निर्बंध लादून इराणची इंधन निर्यात रोखली जात असताना, युरोपिय देश स्वस्थ बसले आहेत, अशी तक्रार इराण करीत आहे. म्हणूनच इराणने ‘होर्मूझ’च्या आखाताची कोंडी करून सर्वच देशांची इंधनवाहतूक रोखण्याची धमकी दिली होती. तसेच अमेरिकेचे आखातातील तळ व इतर हितसंबंध इराणच्या निशाण्यावर आहेत, असा सज्जड इशाराही इराणच्या लष्करी अधिकार्यांकडून दिला जात आहे. ही धमकी अमेरिकेने अत्यंत गंभीरपणे घेऊन आपल्या युद्धनौका, बॉम्बर विमाने व हवाई सुरक्षा यंत्रणा यांची इराणच्या विरोधात तैनाती केली आहे.
या पार्श्वभूमीवर, इराणने युरेनियमचे संवर्धन तब्बल चार पटींनी वाढविण्याचे संकेत देऊन पर्शियन आखात किंवा आखाती क्षेत्रातच नाही, तर सार्या जगात खळबळ माजविली आहे. इराणने अमेरिकेला धमकावू नये, इराणने अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ल्याचा प्रयत्न केलाच, तर तो इराणचा अधिकृत अंत ठरेल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले होते. त्याच्या दुसर्याच दिवशी युरेनियमचे संवर्धन वाढविल्याची बातमी प्रसिद्ध करून इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. याचे भयावह पडसाद लवकरच उमटण्याची दाट शक्यता आहे.
२०१५ सालच्या अणुकराराचे इराणने कधीही पालन केले नाही, असा इस्रायल व सौदी अरेबियाचा आरोप आहे. पुढच्या काळात इराणने युरेनियमचे संवर्धन वाढविले व अणुबॉम्बच्या दिशेने पावले टाकली, तर आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सौदी अरेबियाने याआधीच दिला आहे. तर इस्रायलने कुठल्याही परिस्थिती इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. अण्वस्त्रसज्ज इराणपासून आपल्या सुरक्षेला धोका असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. याआधी इराणच्या नेत्यांनी इस्रायलचे अस्तित्व संपविण्याची भाषा केली होती, याकडे इस्रायलचे नेते वारंवार लक्ष वेधत आहेत.
अशा परिस्थितीत इराणने युरेनियमचे संवर्धन चार पट वाढविण्याचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील वातावरण अधिकच स्फोटक बनविले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी इराणला कुठल्याही परिस्थितीत अणुकराराचे पालन करण्याचे आवाहन केले होते. इराणने अणुकरार मोडला तर त्यानंतरच्या होणार्या सार्या गोष्टींचे खापर इराणवर फोडले जाईल, याची जाणीव रशियन राष्ट्राध्यक्षांनी करून दिली होती. युरोपियन देशदेखील यासाठी इराणवर दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत होते. पण इराणने ही मागणी धुडकावून युरेनियमचे संवर्धन वाढविण्याचा अत्यंत प्रक्षोभक निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे याबाबत वाटाघाटी होऊ शकत नाही, असे जाहीर करून इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर अमेरिका, इस्रायल तसेच सौदी अरेबियासह आखातातील इतर देशांकडून जहाल प्रतिक्रिया उमटू शकते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |