वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी पाहता लवकरच तिसर्या महायुद्धाचा भडका उडेल आणि यावेळी दुसर्या महायुद्धापेक्षाही अधिक प्रमाणात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, अशी गंभीर चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली. पण अमेरिका विकसित करीत असलेल्या अतिजलद ‘लेझर’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही अण्वस्त्रे भेदता येतील. अण्वस्त्रे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांवर तैनात केली तरी लेझर बीम ही क्षेपणास्त्रे कापून काढील. यामुळे अण्वस्त्रांचा वापर कमी होईल, असा दावा अमेरिकेतील ‘रेथॉन’ या आघाडीच्या कंपनीने केला. सदर घोषणा म्हणजे, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत आघाडी घेणार्या आणि अमेरिकेने दिलेला अण्वस्त्रप्रसारबंदीचा प्रस्ताव नाकारणार्या चीनसाठी इशारा असल्याचा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत.
सध्या जीनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रसंघाच्या इन्स्टिट्युट फॉर डिसआर्मामेंट रिसर्च (युएनआयडीआयआर) या गटाच्या संचालिका ‘रेनाटा ड्वॅन’ यांनी जागतिक घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. पारंपरिक अण्वस्त्रबंदी कायद्याला अर्थ उरला नसल्याची जाणीव ड्वॅन यांनी यावेळी करून दिली. अनेक देशांकडून अण्वस्त्रांची निर्मिती सुरू असून आंतरराष्ट्रीय माध्यमे याकडे लक्ष वेधण्यात अपयशी ठरत असल्याची टीका ड्वॅन यांनी केली. तसेच दुसर्या महायुद्धापेक्षाही यावेळी अण्वस्त्र हल्ल्यांचा धोका सर्वाधिक असल्याचा इशारा ड्वॅन यांनी दिला.
राष्ट्रसंघाच्या अधिकार्यांकडून अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिला जात असताना शस्त्रास्त्र निर्मितीत आघाडीवर असणार्या अमेरिकेतील ‘रेथॉन’ कंपनीने मोठी घोषणा केली. ‘रेथॉन’ कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये भविष्यातील अण्वस्त्र हल्ले ‘लेझर यंत्रणा’ हाणून पाडू शकते, असा दावा या कंपनीने केला आहे. अमेरिकेच्या वायुसेनेचे माजी अधिकारी आणि सध्या ‘रेथॉन’ कंपनीत लेझर विभागात काम करणार्या ‘इव्हान हंट’ यांनी शत्रू देशांना इशारा दिला. ‘जर तुमचा देश अण्वस्त्र निर्मितीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असेल. तर अमेरिकेकडे असलेले अतिप्रगत लेझर बीम सदर अण्वस्त्र अचूकपणे कापून काढतील. यामुळे तुम्ही पुन्हा कधी अण्वस्त्रनिर्मितीचा विचारही करणार नाही’, असे हंट यांनी धमकावले.
आतापर्यंत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे अण्वस्त्रांनी सज्ज करण्याकडे जगातील आघाडीच्या देशांचा कल होता. पण गेल्या काही महिन्यांपासून चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला प्राधान्य देऊन यावर अण्वस्त्रे लादण्याचे संकेत दिले आहेत. या हापरसोनिक क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीच्या तुलनेत पाच पटीहून अधिक असतो. अशी क्षेपणास्त्रे रडारवर पकडून त्यांचा वेध घेणे अवघड ठरतो.
पण ‘रेथॉन’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कंपनी तयार करीत असलेली अतिप्रगत लेझर बीम यंत्रणा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांहून वेगवान असल्याचे म्हटले आहे. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारी आपली लेझर यंत्रणा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना सहज हाणून पाडू शकते, असे या कंपनीचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना भेदण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. तर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना भेदणार्या लेझर बीम सध्या निर्मिती अवस्थेत असल्याचे संकेत ‘रेथॉन’ने दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |