अमेरिका-तैवानच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची धमकी

अमेरिका-तैवानच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची धमकी

वॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘जॉन बोल्टन’ आणि तैवानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘डेव्हिड ली’ यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. पण तैवानच्या सुरक्षेबाबतच्या या बैठकीवर चीनने तीव्र संताप व्यक्त केला. ‘‘तैवानबरोबर सहकार्य वाढवून अमेरिका ‘वन चायना’ धोरणाला धक्का देत आहे. चीन ते कदापि सहन करणार नाही’’, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

तैवानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘डेव्हिड ली’ हे अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. १३ ते ३१ मे या दरम्यान डेव्हिड ली अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. दोन्ही सुरक्षा सल्लागारांच्या भेटीची निश्‍चित दिवस व जागा जाहीर करण्यात आली नव्हती. अमेरिका व तैवानने याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. चीनने देखील या भेटीआधी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

पण दोन दिवसांपूर्वी तैवानच्या मुखपत्राने ली यांनी अमेरिकेचा यशस्वी दौरा करून बोल्टन यांच्याशी चर्चा केल्याची बातमी प्रसिद्ध केली. तर अमेरिका आणि तैवानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधील ही पहिली मोठी भेट होती, असे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. डेव्हिड ली आणि जॉन बोल्टन यांच्या भेटीचे तपशील दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेले नाही. मात्र डेव्हिड ली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांच्याबरोबरच अमेरिकेतील लष्करी अधिकारी व अभ्यासगटांच्या विश्‍लेषकांशी देखील भेटल्याचे तैवानच्या मुखपत्राने जाहीर केले.

या भेटीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र संताप व्यक्त केला. ‘या भेटीच्या वृत्ताची कठोर शब्दात निर्भत्सना करून अमेरिकेने तैवानबरोबरचे अधिकृत सहकार्य पूर्णपणे खंडीत करावे’, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ‘लू कँग’ यांनी केले. ‘‘चीन-अमेरिका राजकीय संबंध ‘वन-चायना’ धोरणावर आधारीत आहेत. हे धोरण नाकारून अमेरिका तैवानबरोबर कुठल्याही प्रकारचे सहकार्य प्रस्थापित करणार असेल, तर चीन त्याला कडाडून विरोध करील’, असे कँग यांनी बजावले.

त्याचबरोबर ‘‘‘टू चायना’ किंवा ‘वन चायना, वन तैवान’च्या निर्मितीसाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांच्याविरोधात चीन ठामपणे उभा राहिल. तैवानबाबत चीनची ही स्पष्ट भूमिका असून याबाबत तडजोड शक्य नाही’’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध व ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावरुन कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तैवानबरोबर सुरक्षाविषयक चर्चा करून अमेरिकेने चीनसमोर नवे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे.

तैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. म्हणून इतर कुठलाही देश किंवा संघटनेने तैवानबरोबर स्वतंत्र सहकार्य प्रस्थापित करू नये, अशी चीनची भूमिका आहे. तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचे मान्य करणार्‍या अर्थात ‘वन चायना पॉलिसी’ मान्य असलेल्या देशांबरोबर चीन राजनैतिक तसेच इतर पातळ्यांवरील सहकार्य करीत आला आहे. आजवर अमेरिकेनेही चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला आव्हान दिले नव्हते. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर, त्यांनी तैवानबरोबरचे राजकीय, लष्करी व व्यापारी सहकार्य वाढविण्याचे आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पॅसिफिक क्षेत्रातील देशांनी देखील चीनचा दबाव धुडकावून तैवानशी सहकार्य प्रस्थापित करावे, असे आवाहन अमेरिकेने नुकतेच केले होते. यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगाने पावले उचलल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बोल्टन आणि ली यांच्या बैठकीला पॅसिफिक क्षेत्रातील ‘पलाऊ’ आणि ‘मार्शल आयलँड’ या देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते, असा माध्यमांचा दावा आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info