अमेरिका-इस्रायल-रशियाचे सिरियावर एकमत; इराणबाबत मतभेद

अमेरिका-इस्रायल-रशियाचे सिरियावर एकमत; इराणबाबत मतभेद

जेरूसलेम – जगभरातील माध्यमे व विश्‍लेषकांचे लक्ष लागलेली अमेरिका, इस्रायल व रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधील त्रिस्तरीय बैठक यशस्वी ठरल्याची माहिती समोर येत आहे. संघर्षपूर्ण सिरियामध्ये शांतता, स्थैर्य व सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर या तीनही देशात एकमत असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. त्याचबरोबर सिरियामध्ये कुठलेही परदेशी सैनिक राहणार नाही, या इस्रायलच्या भूमिकेलाही रशियाने समर्थन दिले. मात्र इराणच्या प्रश्‍नावर अमेरिका-इस्रायलशी रशियाचे मतभेद कायम असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले.

आखातातील हालचाली वेग धरत असताना अमेरिका, इस्रायल व रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची विशेष बैठक इस्रायलची राजधानी जेरूसलेममध्ये पार पडली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘जॉन बोल्टन’, इस्रायलचे ‘मिर बेन-शबात’ आणि रशियाचे ‘निकोलाय पत्रूशेव्ह’ यांच्यात यावेळी काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावली. सिरियाबाबत इस्रायलने मांडलेल्या भूमिकांशी अमेरिका व रशियाने सहमती दर्शविली. सिरियाचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्याच्या मुद्यावर तीनही देशांचे एकच उद्दिष्ट असल्याचे पत्रूशेव्ह यांनी सांगितले.

सिरियाचा वापर युद्धभूमी म्हणून, इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी केला जाणार नाही, यावरही सकारात्मक निर्णय घेतल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी सांगितले. पण इराणच्या मुद्यावर अमेरिका-इस्रायल व रशियामध्ये मतभेद कायम असल्याची माहिती रशियन माध्यमे देत आहेत.

इराणपासून या क्षेत्राच्या सुरक्षेला धोका नाही, असा निर्वाळा रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला. पण सिरियातील इराणचे तळ इस्रायलच्या सुरक्षेसाठी तसेच आखातातील इराणच्या हालचाली अरब मित्रदेशांसाठी धोकादायक असल्याचे मुद्दे अमेरिका व इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी यावेळी उपस्थित केले.

येत्या काही दिवसात जपानच्या ‘ओसाका’ येथे होणार्‍या ‘जी-२०’च्या बैठकीबाबतही बोल्टन आणि पत्रूशेव्ह यांच्यात चर्चा पार पडल्याची माहिती रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात ‘जी-२०’मध्ये होणारी चर्चा जेरूसलेममधील बैठकीच्या मुद्यांवर आधारित असेल, असे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

अमेरिका आणि इस्रायल इराणकडून असलेला धोका वारंवार अधोरेखित करीत असताना, रशियाने मात्र इराणवर लष्करी कारवाई झाली, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. चीनने देखील रशियासारखीच भूमिका घेऊन इराणला पाठिंबा दिला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा: