अमेरिका लेझर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धसरावाच्या तयारीत

अमेरिका लेझर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धसरावाच्या तयारीत

वॉशिंग्टन  – रशिया व चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपल्या संरक्षणदलांना लेझर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, डायरेक्ट एनर्जीने सज्ज असलेल्या अतिप्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज केले आहे. भविष्यातील युद्धात ही शस्त्रास्त्रे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे अमेरिकी लष्करी अधिकारी व विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत या युद्धाची तयारी म्हणून लेझर, इलेक्ट्रोमॅग्नेटिकने सज्ज असलेल्या शस्त्रास्त्रांसह युद्धसराव आयोजित करण्याची तयारी अमेरिकेच्या संरक्षणदलांनी केली आहे. अशा प्रकारे उघडपणे केलेला हा पहिलाच युद्धसराव ठरेल.

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेच्या संरक्षणदलांमध्ये लेझर, डायरेक्ट एनर्जी तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या विनाशिका, लांब पल्ल्याची टेहळणी विमाने, स्टेल्थ लढाऊ विमाने त्याचबरोबर रायफल्स या अतिप्रगत तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात येत आहेत. पण या अतिप्रगत तंत्रज्ञानाने सज्ज झालेली शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष युद्धात किती प्रभावी ठरतील, सैनिकांकडून याचा कसा वापर होईल, यातील त्रुटी आणि आवश्यक सुधारणांचा एकत्रित अभ्यास झालेला नाही, असे अमेरिकेच्या ‘एअर फोर्स रिसर्च लॅब’चे म्हणणे आहे.

यासाठी गेल्या आठवड्यात ‘एअर फोर्स रिसर्च लॅब’ने या अतिप्रगत शस्त्रास्त्रांचा संयुक्त युद्धसराव आयोजित करण्याची मागणी केली आहे. या युद्धसरावामुळे अमेरिकेच्या अतिप्रगत शस्त्रास्त्रांच्या क्षमतेची चाचणी होईल. पण त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत अमेरिका किती पुढे आहे, हे देखील स्पष्ट होईल, असे सदर संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी लेझर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, डायरेक्ट एनर्जी वेपन्सची निर्मिती करणार्‍या अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या सहभागी होतील. पुढच्या महिन्याभरात या युद्धसरावाबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असा दावा केला जातो.

याआधी रशियाने लेझरने सज्ज असलेल्या शस्त्रास्त्रांचा युद्धसरावात वापर केल्याची चर्चा होती. पण यासंबंधीची अधिकृत माहिती तसेच फोटोग्राफ्स रशियाने प्रसिद्ध केले नव्हते. तर काही महिन्यांपूर्वी चीनने ‘ईस्ट चायना सी’जवळ विनाशिकेवरुन इलेक्ट्रोमॅग्नेटिकची चाचणी घेतल्याचा दावा जपान व दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी केला होता.

दरम्यान, येत्या काळातील युद्धात ‘डायरेक्ट एनर्जी वेपन्स’ना मोठे महत्त्व असेल, असा इशारा अमेरिकेचे लष्करी अधिकारी अभ्यासगटांचे विश्‍लेषक देत आहेत. अंतराळातील उपग्रह देखील या अतिप्रगत लष्करी तंत्रज्ञानापासून सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे अमेरिकेने जगभरातील आपले हितसंबंध तसेच अंतराळातील उपग्रहांच्या सुरक्षेसाठी डायरेक्ट एनर्जी वेपन्सच्या सज्जतेकडे विशेष लक्ष पुरवावे, असा सल्ला एका विश्‍लेषकाने दिला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info