इराकमधील इराणच्या ठिकाणांवर इस्रायलचे घणाघाती हवाई हल्ले – लंडनस्थित अरबी वर्तमानपत्राचा दावा

इराकमधील इराणच्या ठिकाणांवर इस्रायलचे घणाघाती हवाई हल्ले – लंडनस्थित अरबी वर्तमानपत्राचा दावा

लंडन – इस्रायलच्या ‘एफ-३५’ लढाऊ विमानांनी इराकमधील इराणच्या लष्करी तळांवर हल्ले चढविलेल्या हल्ल्यात इराण व इराणसंलग्न गटांचे ४० जण ठार झाले. तसेच इराणच्या लष्करी तळांवरील क्षेपणास्त्रांचे लॉचर्स आणि इतर शस्त्रसाठा देखील या हल्ल्यात नष्ट झाला. लंडनस्थित अरबी वर्तमानपत्राने इराकी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. इस्रायलची लढाऊ विमाने थेट इराणपर्यंत हल्ले चढवू शकतात, असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी महिन्याच्या सुरुवातीला दिला होता.

‘एफ-३५’, हवाई हल्ले, लष्कराचे नियंत्रण, एफ-३५, लढाऊ विमान, प्रत्युत्तर, इराण, इस्रायल, कुवैत१९ जुलै रोजी इराकची राजधानी बगदादपासून काही अंतरावर असलेल्या दियाला प्रांतात लष्करी तळावर हल्ला झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. पण इराकच्या लष्कराने याविषयी माहिती देण्याचे टाळले होते. पण इराकी लष्कराच्या सूत्रांनी एका अरबी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील इराणच्या लष्करी तळांवर दोन मोठे हल्ले झाले आहेत. गेल्या दहा दिवसात हे हल्ले झाले असून यामध्ये उत्तर दियालाच्या ‘अल-अझीम’ येथील ‘कॅम्प अश्रफ’ या लष्करी तळाचा समावेश आहे.

कॅम्प अश्रफ लष्करी तळावर इराकी लष्कराचे नियंत्रण होते. पण गेल्या काही वर्षांपासून इराकने हा लष्करी तळ इराणकडे सोपविला होता. या लष्करी तळावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) जवान तसेच हिजबुल्लाहचे दहशतवादी तैनात होते. त्याचबरोबर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तसेच मध्यम व लघु पल्ल्याच्या रॉकेट्सचा मोठा साठा देखील इथे होता. हल्ल्याच्या काही तास आधीच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हा साठा इराणमधून ‘कॅम्प अश्रफ’मध्ये आणला होता.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात या लष्करी तळावरील ४० जण ठार झाले असून यामध्ये ‘आयआरजीसी’चे जवान तसेच हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला. या व्यतिरिक्त क्षेपणास्त्रांचा साठाही नष्ट झाल्याचे इराकी सूत्रांनी सांगितल्याची माहिती लंडनस्थित अरबी वर्तमानपत्राने दिली. यानंतरही कॅम्प अश्रफवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आणखी एक हल्ला चढविला होता, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. तर ‘कॅम्प अश्रफ’वरील हल्ल्यात वापरली गेलेली क्षेपणास्त्रे इस्रायली बनावटीची असल्याचा दावा कुवैतमधील एका वर्तमानपत्राने केला.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या माहितीवर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी सिरियातील इराणच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यांवरही इस्रायलने मौन पाळले होते. पण काही महिन्यांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इस्रायलने सिरियात २०० हून अधिक हवाई हल्ले चढविल्याची माहिती उघड केली. तसेच सिरियातील इराणचे तळ आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून यापुढेही हल्ले सुरू राहील, अशी घोषणा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली होती.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून इराण, तसेच इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाह आणि हमास या दहशतवादी संघटना इस्रायलचे अस्तित्व संपविण्याच्या धमक्या देत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इराणच्या या धमक्यांना इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी प्रत्युत्तर दिले होते. ‘इस्रायलची ‘एफ-३५’ विमाने आखातात कुठेही सहज पोहोचू शकतात. सिरियातील हवाई हल्ल्यांनी हे दाखवून दिलेच आहे, पण इस्रायलची विमाने अगदी इराणमध्येही हल्ले चढवू शकतात’, असा सज्जड इशारा इस्रायली पंतप्रधानांनी दिला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info